अलिबाग – रायगड जिल्ह्यात विवीध रंगी भातलागवडीचे प्रयोग यावर्षीही करण्यात आले आहे. निळ्या आणि लाल आणि काळ्या रंगाच्या भात लागवडीनंतर यावर्षी व्हिएतनाम येथे मोठ्या प्रमाणात पिकविण्यात येणाऱ्या हिरव्या भाताची लागवड करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर ही लागवड करण्यात आली असली तरी त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे आगामी काळात या भाताच्या वाणाची लागवड व्यापक प्रमाणात करणे शक्य होणार आहे.
पनवेल तालुक्यातील मिनेश गाडगीळ यांनी गेल्या वर्षी निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या भात लागवडीचे प्रयोग यशस्वीपणे केले होते. त्यापुर्वी काळ्या आणि लाल रंगाच्या भात लागवडही त्यांनी यशस्वी करून दाखवली होती. याच्याच पुढच्या टप्प्यात या वर्षी त्यांनी व्हिएतनाम येथे पिकवल्या जाणाऱ्या हिरव्या भाताच्या वाणाची लागवड केली होती. प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदाच या हिरव्या भाताची लागवड करण्यात आली होती. संपुर्ण सेंद्रीय पध्दतीने लागवड केलेल्या या भाताची लागवड यशस्वी रित्या करण्यात आली असून, पिकही जोमाने आले आहे. त्यामुळे आगामी काळात हिरव्या रंगाच्या या भाताच्या व्यापक प्रमाणात कोकणात लागवड करणे शक्य होणार आहे.
पारंपारीक भात वाणातून मिळणारे मर्यादीत उत्पन्न लक्षात घेऊन मिनेश हे गेल्या काही वर्षांपासून आपल्या शेतात देशाविदेशातील विवीध भात वाणांच्या लागवडीचे प्रयोग करत आले आहेत. जपान, इंडोनेशिया, लेबेनॉन पिकवल्या जाणाऱ्या जांभळ्या आणि निळ्या रंगाच्या भाताची लागवड त्यांनी यापुर्वी केली होती. थायलँण्ड, सिक्कीम आणि भूतान मधील लाल आणि काळ्या रंगाच्या भात वाणांची लागवडही त्यांनी केली होती. हे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी यंदा व्हिएतनाम मधील हिरव्या भाताची लागवड केली. हा प्रयोगही कमालीचा यशस्वी ठरला. कोकणातील उष्ण आणि दमट हवामानात हिरव्या भाताचे चांगले उत्पादन करण्यात त्यांना यश आले आहे. पुढील वर्षी स्थानिक शेतकऱ्यांना हे वाण लागवडीसाठी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. १४० दिवसात हे वाण तयार होत असून, एकरी १५०० किलो पर्यंत उत्पादन घेतले जाऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सामान्य तांदळाच्या तुलनेत रंगीत तांदूळ हा जास्त आरोग्यदायी समजला जातो. प्रामुख्याने मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी हा तांदूळ जास्त उपयुक्त ठरतो. कारण रंगीत तांदुळाचा ग्लॅयसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे रक्तात साखरेचे प्रमाण एकदम वाढत नाही. याशिवाय या तांदुळात फायबर, प्रोटीन, आयर्न, व्हीटॅमीन्स्, ॲन्टीऑक्सीड्न्ट जास्त प्रमाणात आढळतात, त्यामुळेच एक पुरक आहार म्हणून या तांदुळाचा वापर होऊ शकतो.
वाढते औद्योगिकरण आणि शहरीकरण यामुळे गेल्या दशकात रायगड जिल्ह्यातील खरीपाचे क्षेत्र ३० हजार हेक्टरने घटले आहे. शेती आणि शेतकऱ्यांसाठी ही धोक्याच्या घंटा आहे. कष्टप्रद अशा शेतीकडे जिल्ह्यातील तरुण पिढी येण्यास फारशी उत्सूक नाही. शेतीसाठी मजूरही मिळत नाहीत, अशावेळी शेतजमिनी विकण्याचा कल वाढीस लागला आहे.
अशा नकारात्मक वातावरणात जर शेती टिकवायची असेल तर उत्पन्न आणि उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी अधुनिक शेतीशिवाय पर्याय नाही. हीबाब लक्षात घेऊन कोकणातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करणे आवश्यक आहे. कृषी विभागानेही गेल्या काही वर्षात जिल्ह्यात विवीध रंगी भात लागवडीला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्विकारले आहे. ज्याचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले आहेत.
जिथे पारंपारीक तांदुळाला खुल्या बाजारात ५० ते ७० रुपये प्रती किलोचा दर मिळतो. तिथे सेंद्रीय पध्दतीने पिकविलेल्या रंगीत भाताला साडे चारशे ते पाचशे किलोचा दर मिळू शकतो आहे. त्यामुळे रायगडातील शेतकऱ्यांसाठी रंगीत तांदूळ उपयुक्त ठरू शकतात असा विश्वास मिनेश गाडगीळ यांनी व्यक्त केला आहे. .
शेतकऱ्यांनी पारंपारीक भात पिकापेक्षा जास्त उत्पन्न देणाऱ्या आणि बाजारात मागणी असलेल्या भात पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. मिनेश यांनी हीरव्या रंगाच्या भात वाणाची लागवड करून दाखवून दिले आहे. इतर शेतकऱ्यांनी त्यांचे अनुकरण करणे गरजेचे आहे. -भगवान हेगडे, तालुका कृषी अधिकारी
यावर्षी केवळ तीन गुंठे क्षेत्रावर हिरव्या भाताची प्रायोगिक तत्वावर लागवड केली होती. मात्र यातून तयार होणारे बियाणे पुढील वर्षी शेतकऱ्यांना लागवडीसाठी देता येऊ शकेल. -मिनेश गाडगीळ, प्रयोगशील शेतकरी.
