रायगडमध्ये दोन टक्के च सायबर गुन्ह्यांची उकल

तांत्रिक तपासातील गुंतागुत आणि तपासाची व्याप्ती मोठी असल्याने गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.  

पोलिसांपुढे आव्हान, पोलीस ठाणी नावापुरतीच

हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : वाढत्या नागरीकरणाबरोबर रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. यात सायबर आणि आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांसाठी चांगलेच आव्हानात्मक ठरत आहे. दरवर्षी दाखल होणाऱ्या एकूण गुन्ह्यांच्या तुलनेत २ ते ३ टक्केच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश येत आहे. सायबर पोलीस ठाणी ही नावापुरतीच ठरत आहेत.

रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत २०१६ मध्ये २३ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. २०१७ मध्ये १९ सायबर गुन्हे नोंदविण्यात आले. यातील ५ गुन्हे उघकीस आले. २०१८ मध्ये १८ सायबर गुन्हे नोंदविले गेले. यातील एका गुन्ह्याची उकल करणे पोलिसांना शक्य झाले.

 २०१९ मध्ये २१ सायबर गुन्हे दाखल झाले. त्यापैकी एकाच गुन्ह्याची उकल करण्यात यश आले. २०२० मध्ये २७ गुन्हे दाखल झाले. यापैकी एका गुन्ह्याची उकल झाली. तर २०२१ मध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत १४ गुन्हे दाखल झाले. यापैकीही एकाच गुन्ह्याची उकल करण्यात यश आले.

म्हणजेच सलग सहा वर्षांत दाखल झालेल्या सायबर गुन्ह्यापैकी फक्त २ ते ३ टक्के गुन्ह्याची उकल करणे सायबर गुन्हे शाखेला शक्य झाले आहे. ही परिस्थिती रायगड जिल्ह्यापुरतीच मर्यादित नाही. राज्यातही सायबर गुन्ह्याची उकल होण्याचे प्रमाण फारसे चांगले नाही.

राज्यभरात २०२० मध्ये ५ हजार ४९६ गुन्ह्यांची नोंद झाली. यात प्रामुख्याने ऑनलाइन बँकिंग फसवणूक, ओटीपी नंबर मागून झालेली फसवणूक, क्रेडिट कार्ड संदर्भातील गुन्हे, एटीएम संदर्भातील गुन्हे आणि महिला आणि लहान मुलांशी निगडित गुन्ह्यांचा समावेश आहे.

तांत्रिक तपासातील गुंतागुत आणि तपासाची व्याप्ती मोठी असल्याने गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.  

राष्ट्रीय गुन्हेगारी अहवालानुसार २०२० मध्ये देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण ११.८ टक्क्यांनी वाढले. देशात ५० हजार ०३५ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यात उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील दाखल गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक होते. तर त्याखालोखाल महाराष्ट्र हा सायबर गुन्हे दाखल होण्यात दुसऱ्या क्रमांकावर होता. चिंताजनक बाब म्हणजे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण ज्या प्रमाणात वाढत आहे. त्या प्रमाणात गुन्ह्यांची उकल होताना दिसत नाही. त्यामुळे सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्यभरात सुरू करण्यात आलेली ४७ सायबर पोलीस ठाणी कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

जगभरात सायबर गुन्ह्यांची व्याप्ती वाढत आहे. तपासातील गुंतागुंत आणि क्लिष्टता यामुळे या गुन्ह्यांचा तपास आव्हानात्मक ठरत आहे. तपासासाठी तज्ज्ञ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यास कारणीभूत ठरत आहे. वास्तविक पाहता या विभागात कार्यरत असणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी तांत्रिक विभागाशी निगडित असणे गरजेचे आहे. त्यांना संगणकशास्त्र आणि मोबाइल टेलिकम्युनिकेशन प्रणालीचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे.

क्रिप्टोग्राफी, नेटवर्क फॉरेन्सिक, मोबाइल डाटा फॉरेन्सिक, हॅकिंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, विविध प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टिम्स, फायरवॉल तंत्रज्ञान याचे शास्त्रशुद्ध ज्ञान असणाऱ्या व्यक्तींचीच या विभागात नियुक्ती करणे गरजेचे आहे. पण सध्या पोलीस दलात कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच प्रशिक्षण देऊन तपासाची जबाबदारी सोपविली जात आहे. हे देखील सायबर गुन्ह्याची उकल न होण्यामागचे मूळ कारण आहे. या गुन्ह्यांच्या तपासातील मर्यादा लक्षात घेऊन नागरिकांनी सायबर गुन्ह्यापासून सतर्क राहणे गरजेचे आहे.

कशी होते फसवणूक?

तुम्हाला ५० लाख डॉलरची लॉटरी लागली आहे… आपले एटीएम डेबिट कार्ड बंद करण्यात आले आहे… आम्ही प्राप्तिकर विभागातून बोलत आहोत… तुमच्या खात्यातील रकमेची माहिती हवी आहे… विमा कंपनीतून बोलत आहोत… तुमच्या खात्याचे तपशील हवे आहेत…तुम्हाला ओटीपी आला आहे, तो सांगा… अशा प्रकारचे संदेश आणि फोन करून नागरिकांची फसवणूक केली जाते. याशिवाय एटीएम कार्ड स्कॅनर आणि मोबाइल सिम स्वॅपिंग पद्धतीचा अवलंब करून आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

ऑनलाईन मद्य मागवणे महागात…

अलिबाग येथील एका महिलेची नुकतीच एक लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलेने घरातील एका लग्न समारंभासाठी मद्याची ऑनलाइन मागणी नोंदवली होती. या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

पोलिसांचे खबरदारीचे आवाहन

’ एटीएम पिन, ओटीपी कोणालाही देऊ नका

’ बँक खात्याचे तपशील देऊ नका

’ निर्मनुष्य भागातील एटीएमचा वापर टाळा

’ बँकेच्या शाखेतील एटीएम केंद्रांचाच वापर करा

’ संशयास्पद फोन कॉल्सला आणि संदेशांना उत्तर देऊ नका

’ लिंक्सचा वापर करून बँकेचे संकेतस्थळ उघडण्याचा प्रयत्न करू नका.

’ आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नका 

सायबर गुन्ह्यांचा तपास करणे आव्हानात्मक असते. त्यामुळे तपासाला विलंब होतो. या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाते. दुसऱ्या बाजूला अशा गुन्ह्यांना बळी पडू नये यासाठी सर्व पोलीस ठाण्यांमार्फत जनजागृती केली जात आहे. लोकांनी फसव्या जाहिराती, भूलथापा यांना बळी पडू नये.  – अशोक दुधे, पोलीस अधिक्षक रायगड

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raigad only two per cent cyber crimes are solved police station in name only akp