अलिबाग– रायगड पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रांचे डिजीलॉकर मध्ये प्रमाणीकीकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय पातळीवर डिजीलॉकरचा वापर करून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्य़ा ओळखपत्रांचे प्रमाणीकीकरण करणारे, रायगडचे पोलीस दल पहिलाच घटक ठरला आहे.

बनावट पोलीसांकडून सायबर फसवणूकीचे प्रकार देशभरात समोर येत आहेत. पोलीस असल्याची बतावणी करून वयस्कर व्यक्तींना धमकावून, त्यांच्याकडून आर्थिक रक्कम उकळल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. अशा गुन्ह्यांमध्ये बनावट ओळखपत्र दाखवून फसवणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. हीबाब लक्षात घेऊन रायगड पोलीसांनी आपल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रांचे डिजीलॉकर व्दारे प्रमाणीकीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला. महत्वाची बाब म्हणजे सर्व ओळखपत्रांचे प्रमाणीकीकरण पूर्णही करून घेतले.

केंद्र सरकारच्या डिजीटल इंडीया उपक्रमाचा भाग असलेल्या डिजीलॉकर हा महत्वाचा उपक्रम आहे. ज्यामध्ये शासकीय कागदपत्र आणि ओळखपत्रांची सुरक्षीतपणे जपणूक केली जाऊ शकते. या प्रणालीचा वापर करून रायगड पोलीस दलातील सर्व दोन हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या ओळखपत्रांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यात दाखवण्यात आलेले पोलीस खरे आहेत का याची पडताळणी जनसामान्यांनाही करता येऊ शकणार आहे.

राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या उपक्रमाची घोषणा स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून करण्यात आली, यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आँचल दलाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले उपस्थित होत्या. यावेळी न्याय सारथी या कृत्रिम बुध्दीमत्तेवर आधारित चॅट बोट उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. तक्रार दारांना या चॅट बोट प्रणालीच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती आधारे मार्गदर्शन करून तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला जाणार आहे.