श्रीवर्धन- श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याला लाटांचा तडाखा बसला आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील बंधाऱ्याची दुरावस्था होण्यास सुरूवात झाली आहे. जिवना बंदर परिसरात सुरू असलेल्या कामे आणि भरावाचा दुष्पपरिणाम या बंधाऱ्यावर होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे लाटांच्या तडाख्याने उखडलेल्या बंधाऱ्यांच्या रॅम्पची दुरुस्ती करावी आणि लाटाच्या तडाख्यामुळे अस्ताव्यस्त पसरलेल्या दगडांची नव्याने पुर्नरचना करून बांधणी करावी अशी मागणी केली जात आहे.
श्रीवर्धन शहराला अडीच किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलाय , २००९ साली साधारण दीड किलोमीटर लांबीच्या अंतरावर धुप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात आला, निसर्ग वादळाचा या बंधाऱ्याला तडाखा बसला त्यामुळे बंधाऱ्याची वाताहत झाली. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी बंधाऱ्याचे नव्याने सुशोभिकरण करून घेतले. आकर्षक सजावटीमुळे हा बंधारा पर्यटकांच्या पसंतीला उतरु लागला आहे. पण सद्यस्थितीत बंधाऱ्यावरून किनार्याकडे जाणारा रॅम्प व पायर्यांची अजस्त्र लाटांनी दुरावस्था झाली आहे.
जीवनाबंदर येथे सुरू असलेल्या अत्याधुनिक जेटी चे बांधकाम तसेच मुळगाव कोळीवाडा येथील ग्रोयांन्स पद्धतीचा बंधाराची कामे सुरू आहेत. यासाठी दगड व मातीचा भराव टाकण्यात येत आहेत. या भरावाचे श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरील सुशोभिकरण करण्यात आलेल्या बंधाऱ्यावर दुष्परीणाम होऊ लागला असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जाऊ लागला आहे.
श्रीवर्धनची भौगोलिक रचना ही दोन डोंगराच्या मध्ये आहे. जिवना बंदराच्या कामामुळे समुद्राचे पाण्याची दिशा बदलली आहे. त्याचा परिणाम अडीच किलोमीटर लांबीच्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्यावर होऊ लागली आहे. लाटांमुळे धुपप्रतिबंधक बंधाऱ्याची पडझड सुरू झाली आहे. बंधारा लगत असलेल्या रॅम्प व पायर्यांची दुरावस्था झाली आहे तसेच सुरू ची झाडे ही लाटांमुळे भुईसपाट झाली आहेत.
त्यामुळे बंदराच्या कामासाठी सुरू असलेल्या भरावाचे दुष्पपरिणाम इतरत्र होऊ नये यासाठी उपाय योजना कराव्यात आणि लाटांच्या तडाख्यामुळे उखडलेल्या रॅम्प आणि बंधाऱ्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.
श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याला नुकताच आंतराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग पायलट मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे श्रीवर्धन समुद्र किनारा जागतिक पर्यटन नकाशावर पोहोचणार आहे,ज्यामुळे स्थानिक पर्यटन आणि रोजगाराला चालना मिळणार आहे. परंतु बंदर विकासाच्या कामामुळे जर किनारपट्टीवर परिणाम होणार असेल तर त्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी हस्तक्षेप करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.
श्रीवर्धन येथे विकास कामे होत आहेत त्याला आमचा विरोध नाही. पण विकास काम करताना त्याचे दुष्पपरिणाम इतर भागांवर होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. खाडी मध्ये नैसर्गिकरित्या पाणी जायचा मार्ग बंधारा करून अरुंद झाल्याने त्याचा परिणाम आसपासच्या परिसरावर होत आहे. – देवेंद्र भुसाणे. स्थानिक श्रीवर्धन.
जीवना बंदर व मुळगाव कोळीवाडा येथे होत असलेल्या बंधाऱ्यांमुळे समुद्राचे पाणी किनाऱ्याकडे धडकत आहे. त्यामुळे बंधाऱ्याची पडझड होण्यास सुरूवात झाली आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करायला हव्यात. – जुनैद दुस्ते. उप तालुका प्रमुख शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) श्रीवर्धन
