अलिबाग- रायगड पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर आता आंचल दलाल यांनी पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. बारा पोलीस अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्या आहेत. सर्व अधिकाऱ्यांना तातडीने नवीन ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डझनभर अधिकाऱ्यांच्या बदली सत्रामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
रायगड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे यांची तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात आली आहे. कर्जतचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांची दहशतवाद विरोधी शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे गुन्हे शाबिती शाखेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. गरड यांना परशुराम कांबळे यांच्याकडून तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गरड यांच्याजागी नियंत्रण कक्षातील संदीप भोसले यांना कर्जत पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक देण्यात आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांची खोपोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तर खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी म्हणून नेमणूक देण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील महिला पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांना पाली पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक देण्यात आली आहे. तर पालीच्या महिला पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्यावर भरोसा सेलची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
गुन्हे शाबिती शाखेचे परशुराम कांबळे यांना मुरूड पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांची बदली अर्जशाखेत करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार सानप यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्याकडे पोलीस उपअधीक्षक मुख्यालय पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. नवीन नेमणूकीच्या ठिकाणी हजर राहण्यासाठी या सर्वांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. रायगडच्या पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी याबाबतचे आदेश पारीत केले आहेत.
महत्वाची बाब म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे आणि कर्जतचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन बदली करण्यात आली आहे. डझनभर अधिकाऱ्यांच्या या बदली सत्रामुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.