जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. आगामी निवडणुकीसाठी रायगड जिल्हा परीषदेची सदस्यसंख्या सातने वाढून ६६ वर जाणार आहे. तर पंचायत समिती सदस्यांची संख्या १४ ने वाढून १३२ वर पोहोचण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील प्रारूप आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला असून तो आज(गुरुवार) निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे.
रायगड जिल्हा परीषदेची सदस्य संख्या पूर्वी ६२ होती त्यानंतर ती कमी होवून ५९ झाली. आता पुन्हा ही सदस्यसंख्या सातने वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे गण यांच्या संख्येत वाढ करण्याचा राज्य सरकारने आदेश जारी केला आहे. अध्यादेशानुसार मतदारसंघांची फेररचना करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या ५५ पेक्षा कमी नाही, तर ८५ पेक्षा जास्त नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एकूण सदस्य संख्या ६६ होणार असून, ज्या पक्ष किंवा गटाकडे किमान ३४ इतकी सदस्यसंख्या असेल त्यालाच सत्ता स्थापन करण्याची संधी मिळणार आहे.
जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या या प्रारुप आराखड्यावर हरकती मागवण्यात येतील त्यांचा विचार करून त्याला अंतिम रूप देवून मंजूर केला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या गटांबरोबर पंचायत समितीच्या १४ गणांचीही भर पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या एका गटामध्ये दोन पंचायत समिती गण समाविष्ट आहेत.
उरण, पनवेल, खालापूर, पेण, अलिबाग, रोहा आणि माणगाव या सात तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक जिल्हा परीषद मतदार संघ वाढणार आहे. त्याचबरोबर या तालुक्यांमध्ये पंचायत समितीचे दोन मतदार संघ वाढणार आहेत. नव्या गटरचनेचे आराखडे तयार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून सूचना आल्यानंतर हा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाची मुदत २१ मार्च रोजी संपणार आहे, त्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये नव्या मतदार संघांचाही समावेश असणार आहे.
मे महिन्यात निवडणुका ?
नवीन मतदारसंघ (गट आणि गण) निश्चित झाल्यानंतरच जिल्हा परीषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होतील. करोनामुळे ही सर्व प्रक्रिया लांबणीवर पडली होती. परंतु आता ती वेगाने सुरू होईल. त्यामुळे या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नव्या रचनेनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदार संघाचा प्रारुप आराखडा आज निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला . यावर येणाऱ्या हरकतींवर निर्णय झाल्यानंतर नवीन मतदार संघांची यादी प्रसिद्ध केली जाईल. असे रायगडचे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के पाटील यांनी सांगितलं आहे.