रेल्वेचा पर्यावरणपूरक निर्णय; वर्षांला १०७ कोटींची बचत अपेक्षित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : रेल्वे रुळाजवळील आणि इतर मोकळ्या भूखंडांवर  सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या उपक्रमातून वर्षांला १०७ कोटी रुपायांची बचत अपेक्षित आहे.

देशातील बहुतांश रेल्वेगाडय़ा विजेवर तर मोजक्या गाडय़ा डिझेलवर धावतात. रेल्वे महिन्याला कोटय़वधी रुपये विजेवर खर्च करते. हा खर्च कमी करण्यासाठी भारतीय रेल बिजली कंपनी लि. (बीआरबीसीएल) सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत बिहार आणि राजस्थानमध्ये वीज निर्मिती केली जात आहे. यासोबतच रेल्वेने प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने त्यात पुढाकार घेतला असून येत्या वर्षभरात रेल्वेच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर तसेच रेल्वेच्या मोकळ्या भूखंडांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातून निर्माण होणारी वीज रेल्वेगाडय़ांसाठी वापरली जाणार आहे. मध्य रेल्वेने ट्रॅक्शन (रेल्वेगाडय़ा) वापरासाठी १०९ मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जा प्रकल्पांची स्थापना करण्याकरिता रुळाशेजारील मोकळा पट्टा तसेच वापरात नसलेली जमीन ‘लँड बेस्ड’ सौर ऊर्जा निर्मितीसाठी  निश्चित केली आहे. याठिकाणी वर्षांकाठी १४३ दशलक्ष युनिट ऊर्जा उत्पादन होईल. यामुळे वर्षांकाठी वीज देयकात ४३ कोटी रुपयांची बचत होईल. त्याचप्रमाणे रेल्वेगाडय़ा व्यतिरिक्त इतर ठिकाणी वापरासाठीही सौर ऊर्जा तयार केली जाईल. त्यासाठी मोकळ्या जमिनीचे भूभाग विविध ठिकाणी निश्चित करण्यात आले आहेत. त्याठिकाणी ७१ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांची योजना आखली आहे. त्यातून वर्षांकाठी ९३ दशलक्ष युनिट वीज उत्पादन होईल आणि वर्षांकाठी  ६४ कोटी रुपयांची बचत होईल. अशाप्रकारे, वार्षिक खर्चाच्या वीज देयकात एकूण  १०७ कोटींची बचत होईल, असा दावा मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी केला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या धोरणानुसार,  २०३० पर्यंत पूर्णपणे हरित होण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

मध्य रेल्वे  ‘ओपन अ‍ॅक्सेस आणि नेट मीटरिंग’द्वारे  ऊर्जेचा खर्च कमी करण्यासाठी पर्यावरणास अनुकूल सौर आणि पवन ऊर्जा यासारख्या पर्यायाचा अंगिकार करण्याचे ठरवले आहे. मध्य रेल्वेने आपल्या ५ विभागांत आणि ४ कार्यशाळांमध्ये १४.३७९  मेगावॅट क्षमता असलेल्या रूफटॉप सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी योजना आखली आहे. नागपुरातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या इमारतीवर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, पुणे आणि विविध कार्यशाळा व स्थानकांच्या फलाटांच्या छतावर ४.९२ मेगावॅट क्षमतेच्या संयंत्राची स्थापना केली आहे. येथून  दरवर्षी ६.४ दशलक्ष युनिट्स ऊर्जेची निर्मिती होते. त्यामुळे  वर्षांला ४.१ कोटी रुपयांची बचत होत आहे.

पवन ऊर्जा

सांगली येथे रेल्वेगाडी वापरासाठी एकत्रित ५०.४ मेगावॅट क्षमतेची पवन मिल स्थापित केली आहे. इतर ठिकाणी वापरासाठी एकत्रित ६ मेगावॅट क्षमतेची पवन मिल स्थापित केली आहे.

रेल्वेच्या अनेक इमारतींच्या छतावर सौर ऊर्जा निर्माण केली जात आहे. तसेच रुळाच्या बाजूच्या जमिनीचा तसेच इतर ठिकाणच्या मोकळ्या भूखंडांचा सौर ऊर्जा निर्मितीसाठी वापर केला जाणार आहे.

– प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railways to set up solar power projects near railway tracks and other vacant plots zws
First published on: 30-07-2020 at 01:32 IST