माती ओली असल्याने व्यवसाय अडचणीत; शेकडो मजुरांच्या रोजगारावर गदा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रमेश पाटील, वाडा

दिवाळी सणानंतर लगेच सुरू होणारा वीटभट्टी व्यवसाय या वर्षी पाऊस लांबल्यामुळे अद्याप सुरू न झाल्याने हा व्यवसाय करणारे अडचणीत आले आहेत. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेकडो मजुरांचा रोजगार बुडाल्याने त्यांच्यावरही उपासमारीचे संकट ओढावले आहे.

वाडा, विक्रमगड तालुक्यातील बहुतांशी शेतकरी आपल्या शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून वीट बनवण्याचा व्यवसाय करतात. खरीप हंगाम संपल्यानंतर शेतकरी जव्हार, मोखाडा तालुक्यातील मजूर आणून वीट बनवण्याचा व्यवसाय सुरू करतात. खरीप हंगाम संपून महिना झाला असला तरी अवकाळी पावसामुळे शेतातील पाणी न सुकल्याने आणि मातीत अद्याप ओल असल्याने अद्याप वीट व्यवसायाला सुरुवात झाली नाही.

अवकाळी पावसाने येथील शेतकऱ्यांच्या भातपिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले, पण आता वीट व्यवसाय करणाऱ्यांवरही मोठे संकट ओढवले आहे. वीट व्यवसायासाठी लागणारी जमीन सुकलेली नसल्याने त्या ठिकाणी साफसफाई करता येत नाही. वीट बनवण्यासाठी लागणारी माती खूपच ओली असून तिथे खोदताही येत नाही आणि मातीची वाहतूकही करता येत नाही, असे येथील वीटभट्टी व्यावसायिकांनी सांगितले.

सुकलेली माती खड्डय़ात भिजवून मळावी लागते, त्यानंतर ती वीट बनवण्याच्या साच्यात टाकून वीट बनवली जाते. बनवलेली वीट सात ते आठ दिवस  सुकवून भट्टीमध्ये तुस, दगडी कोळसा टाकून भाजली जाते. ही सर्व कामे मजुरांकडून केली जातात.

वीटभट्टी व्यवसायासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांतून दोन लाखांहून अधिक मजूर ठिकठिकाणी स्थलांतरित होत असतात. या व्यवसायातून चांगला रोजगारही या मजुरांना मिळत असतो. मात्र अवकाळी पावसामुळे हा व्यवसायच सुरू करता आला नसल्याने त्याचा फार मोठा तोटा सहन करावा लागत आहे

अद्याप उत्पादन सुरू नाही

नोव्हेंबरमध्ये भट्टीतून विटा भाजून विक्रीसाठी पाठवण्यात येतात. या विक्रीतून येणाऱ्या पैशांतून मजुरांची मजुरी दिली जाते, तसेच वीटभट्टीसाठी नव्याने दगडी कोळसा खरेदी केला जातो. मात्र नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला तरी अजूनपर्यंत हा व्यवसाय सुरू न झाल्याने वीट उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

शेतीला जोडधंदा म्हणून गेल्या पंधरा वर्षांपासून वीटभट्टीचा व्यवसाय करतो. मात्र या वर्षी भातशेतीमध्येही मोठे नुकसान झाले. पाऊस लांबल्याने वीट व्यवसाय ठप्प झाला आहे.

– सुनील मोकाशी, वीटभट्टी व्यावसायिक, जामघर, ता. वाडा

वीट व्यवसायात मजुरांना आगाऊ मजुरी द्यावी लागते. मजुरीचे निम्मे पैसे गणेशोत्सव, दिवाळी सणावेळीच दिलेले असतात. मात्र पावसामुळे हा व्यवसायच सुरू करता आला नसल्याने मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

– नरेश पाटील, वीट उत्पादक, चंद्रपाडा

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain affects brick kilns business in wada zws
First published on: 20-11-2019 at 03:43 IST