सावंतवाडी : Maharashtra Weather Forecast सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १११.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ८०.५ मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी १७९६.६ मि.मी. पाऊस झाला आहे. दरम्यान गगनबावडा कोल्हापूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती, तर जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आल्याने रस्त्यावर पाणी आले होते. कणकवली ते कोल्हापूर मार्गावर मांडकुली गगनबावडा नदीला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तसेच तिलारी आंतरराज्य प्रकल्पातून पाणी विसर्ग सुरू झाल्याने भेडशी खालचा बाजारात पाणी आले होते.
तसेच तिलारी नदीच्या पात्राशेजारील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बांदा तेरेखोल नदी, गड नदी तसेच अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देताना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे, त्यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक, वीज वितरण व्यवस्था ठप्प झाली होती. जिल्ह्यातील नागरिक व आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आहे.