जिल्ह्यात २२ जूनपासून पावसाने पाठ फिरविल्याने बळिराजा चिंताग्रस्त होता. परंतु मंगळवारी रात्री औंढा परिसरात काही भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यात काही शेतकऱ्यांच्या केळीबागेचे नुकसान झाले. बुधवारीही काही भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला.
जिल्ह्यात मृगाच्या पावसाने दमदार सुरुवात केली. शेतकऱ्यांनी खरीप पेरण्यांना प्रारंभ केला. ८० टक्क्यांवर पेरणी आटोपली. पण २२ जूनपासून पावसाने पाठ फिरविली आणि कडक उन्हामुळे कोवळी पिके माना टाकू लागली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी रात्री व बुधवारी जिल्ह्याच्या विविध भागांत रिमझिम पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली.
औंढा तालुक्यात मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे गोळेगाव परिसरातील शेतकरी नामदेव गिरे यांच्या दोन एकर शेतातील केळीचे नुकसान झाले. वगरवाडी, गलंडी परिसरातच हा पाऊस झाला. सेनगाव तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल कापडसिंगी, साखरा भागात, तसेच तांदुळवाडी, बोडखा, ब्रह्मवाडी, हत्ता तसेच गोरेगाव सर्कलमध्ये ब्राह्मणवाडा, सुरजखेडा, गारखेडा व सवना परिसरात पावसाने हजेरी लावली.
लातूरला पावसाची हजेरी
वार्ताहर, लातूर
तब्बल तीन आठवडय़ांच्या विश्रांतीनंतर बुधवारी लातूरमध्ये पावसाने हजेरी लावली. अध्र्या तासाच्या पावसाने हवेतील उकाडा कमी झाला. या पावसाचा फारसा उपयोग नसला, तरी पावसाने हजेरी लावल्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. बुधवारी दुपारी साडेतीननंतर लातूर शहरात सुमारे अर्धा तास, तर रेणापूर, पानगाव, औसा, अहमदपूर, हरंगुळ आदी परिसरात सुमारे १५ मिनिटे पावसाच्या हलक्या सरी पडल्या.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jul 2015 रोजी प्रकाशित
हिंगोलीत पाऊस परतला; केळीच्या बागेला फटका
जिल्ह्यात २२ जूनपासून पावसाने पाठ फिरविल्याने बळिराजा चिंताग्रस्त होता. परंतु मंगळवारी रात्री औंढा परिसरात काही भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.

First published on: 02-07-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain return in hingoli damage to banana garden