सांगली: वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असताना पत्र्याच्या शेडवर वीज कोसळून सहा शेळ्यांसह आठ जनावरे ठार होण्याची घटना घोरपडी (ता. कवठेमहांकाळ) येथे गुरुवारी रात्री घडली. यामध्ये शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान झाले असून, शुक्रवारी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला.
गुरुवारी सायंकाळी कवठेमहांकाळ तालुक्यात वळवाच्या आगमनावेळी वादळी वारे सुरू होते. याच वेळी विजेचा कडकडाटही सुरू होता. घोरपडी गावच्या शिवारात मधुकर कुंडलिक सरगर यांचे जुनोनी रस्त्यावरील शेतात जनावरांसाठी पत्र्याचे शेड आहे. या शेडवर वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा शेळ्या, एक कोकरू आणि एक खोंड अशी आठ जनावरे मृत्युमुखी पडली.
सरगर यांनी नेहमीप्रमाणे शेतातील शेडमध्ये जनावरे बांधली होती. अचानक पूर्वेकडून आलेल्या वाऱ्यामुळे आडोसा म्हणून बांधलेल्या शेडनेटचेही नुकसान झाले. याच वेळी शेडवर वीज कोसळली. यात या जनावरांचा मृत्यू झाला.याची माहिती गावकामगार तलाठ्यांना देण्यात आली.
आज सकाळी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेडची पाहणी करत पंचनामा केला. या दुर्घटनेत सरगर यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.