सोलापूर : सातत्याने पडत असलेल्या वळवाच्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात १२८ गावांतील १ हजार २४८ हेक्टर क्षेत्रावरील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २०६ मिमी सार्वत्रिक पाऊस झाला आहे. त्यामुळे नद्यांना प्रचंड प्रमाणात पाणी वाढले असून तेथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गावोगावी शेतांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे जागोजागी शेततळ्यांचे स्वरूप आले आहे. या पावसाचा फटका बागायती फळबागांना बसला आहे. जिल्ह्यातील १२८ गावे पावसाच्या तडाख्यात सापडली आहेत. यात एकूण १२४८ हेक्टर क्षेत्रावर पिकांची हानी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. केळी, द्राक्षे, पपई, सीताफळ, आंबा, चिक्कू, डाळिंब आदी फळबागांना फटका बसला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावच्या शिवारात १४ दिवसांत आतापर्यंत २१० मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे संपूर्ण गाव शिवारात पाणी साचले आहे. शेतात पाण्याचे तळे निर्माण झाले असून पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. याच गावातील मल्लिनाथ पटणे यांच्या पाच एकर क्षेत्रातील पंपईची बाग वादळीवाऱ्यासह पावसामुळे जमीनदोस्त झाली आहे. यात पटणे यांनी २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागत असल्याचे सांगितले. हे नुकसानीचे चित्र अक्कलकोटपासून ते करमाळा, माळशिरस तालुक्यापर्यंत दिसून आले.
बार्शी तालुक्यातील भोगावती नदीला पूर आल्याने त्या भागातील गावांचा संपर्क तुटला आहे. यात बार्शी येथून तुळजापूरकडे निघालेली एसटी बस पावसातून वाट काढत बार्शीपासून काही अंतरावर रेल्वे बोगद्यातून जात असताना अचानकपणे बंद पडली. ही एसटी बस रेल्वे बोगद्यातच अडकून पडली होती. त्यातच पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पथकाने धाव घेऊन एसटी बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले.