नांदेड : यंदाचा पावसाळा संपण्यास अद्याप दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक असला, तरी पूर्वा नक्षत्र संपतासंपताच जिल्ह्यामध्ये आतापर्यंत झालेल्या पावसाने वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी पार केली असल्याचे शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट झाले. पावसाळ्यातील उत्तरा नक्षत्र शनिवारपासून सुरू होत आहे. त्यानंतरचे ‘हस्त’ नक्षत्र तडाखेबंद पावसासाठी ओळखले जात असल्यामुळे जिल्ह्याचा बव्हंश भाग ओल्या दुष्काळाखाली आला असून लोकप्रतिनिधींकडून विशेष अर्थसाहाय्याच्या मागणीचा दबाव प्रशासनावर वाढला आहे.
यंदा मृग नक्षत्रातच दमदार पाऊस झाला. पण नंतर आषाढ महिन्यात पावसाने बरीच ओढ दिली, तरी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ३४८ मि.मी. म्हणजे ३९ टक्के पावसाची नोंद झाली. पण नंतर एका ऑगस्ट महिन्यातच वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांसह पशुधन आणि इतर मालमत्तांना जबर तडाखा बसला. ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्यात ९० टक्के पाऊस झाला. त्यानंतर शुक्रवारी सकाळपर्यंत पावसाने ९८ टक्क्यांचा पल्ला पार केला. शुक्रवारी दुपारनंतर नांदेड शहरासह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे वार्षिक सरासरी पार झाली.
गतवर्षी १२ सप्टेंबरपर्यंत नांदेड जिल्ह्यात ८०५ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यंदा याच तारखेपर्यंत ८७४ मि.मी. पाऊस पडला. १२ सप्टेंबरपर्यंत ७१४ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असते. पण यंदा १५ सप्टेंबर पूर्वीच १५० मि.मी. हून अधिक पाऊस अधिक असल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी आणि जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात आलेल्या पुरात कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले, तरी राज्यशासनाकडून कुठल्याही प्रकारची विशेष आणि दिलासादायक मदत अद्याप जाहीर झालेली नाही.
जिल्ह्यातील सर्वच आमदार-खासदारांनी मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांकडे धाव घेऊन आपापल्या भागातील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत करण्यासंदर्भातील निवेदने सादर केली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मधल्या काळात धावता दौरा केला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन एकदा येऊन गेले. पण शासकीय पातळीवर नांदेड जिल्ह्यासाठी कुठल्याही प्रकारचा स्वतंत्र निर्णय अद्याप झालेला नसल्यामुळे सत्ताधारी महायुतीतील आमदारांच्या मर्यादा स्पष्ट होऊ लागल्या आहेत.
नायगाव मतदारसंघाचे भाजपाचे आमदार राजेश पवार, मुखेडचे डॉ.तुषार राठोड यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन २०१९ साली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जशी मदत दिली गेली, तशी मदत नांदेड जिल्ह्यातील पूर आणि आपत्तीग्रस्तांना देण्याची मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शुक्रवारी जिल्हाधिकार्याकडे एक शिष्टमंडळ नेले होते.
यानिमित्ताने झालेल्या चर्चेमध्ये कोल्हापूरच्या धर्तीवरच विशेष मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. खा.अशोक चव्हाण हेही काही बैठकांनिमित्त जिल्हाधिकार्यांकडे गेले होते. बैठकांचे सत्र सुरू असतानाच जिल्हाभर पूर्वा नक्षत्रातील शेवटचा पाऊस सुरू झाला होता. जिल्ह्यात यंदा आतापर्यंत सर्वाधिक पाऊस किनवट तालुक्यात (१४४ %) तर सर्वात कमी पाऊस बिलोली तालुक्यात (९६ %) झाला आहे. इतर सर्व तालुक्यांनी टक्केवारीमध्ये शंभरी पार केलेली आहे.