अकोले : भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी व घाटघरच्या पावसाने आज, शनिवारी ३ हजार मिमीचा टप्पा ओलांडला. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील कळसूबाई, रतनगडाच्या डोंगर रांगानी वेढलेला भंडारदरा पाणलोटाचा १२२ चौ. किमी. परिसर पावसाच्या बाबतीत समृद्ध आहे. निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या या परिसरात पावसाळ्याचे तीन-साडेतीन महिन्यात सरासरी तीन ते पाच- साडेपाच हजार मिमी दरम्यान पाऊस कोसळतो.
कोकणकड्याजवळ वसलेल्या घाटघरची ओळख त्यामुळेच जिल्ह्याची चेरापुंजी अशी आहे. येथील भूमीच्या लौकिकास असाच पाऊस या वर्षी पडत आहे. मान्सूनचे आगमन तसे उशिराच या वर्षी झाले, मात्र मोसमी पावसास सुरुवात झाल्यानंतर विनाखंड तो महिनाभर कोसळत होता. या काळात अनेकवेळा मुसळधार पावसाची संततधार सुरू होती. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पाणलोट क्षेत्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. आज घाटघर येथे १२० मिमी तर रतनवाडीला १४४ मिमी पावसाची नोंद झाली. १ जूनपासून २६ जूनपर्यंत घाटघरला ३ हजार २२ मिमी तर रतनवाडीला ३ हजार ९५ मिमी पाऊस पडला आहे.
मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरणात सकाळपर्यंतच्या चोवीस तासात ४१० दलघफूट तर निळवंडे धरणात २०६ दलघफूट पाण्याची भर पडली. भंडारदरा धरणातून ८२५ क्युसेक विसर्ग सुरू आहे तर निळवंडेमधून नदीपात्रात ९०० क्युसेक व निळवंडे कालव्यात ६७० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ९ हजार २८ दलघफूट (८१.७८ टक्के) तर निळवंडेचा साठा ७ हजार ३१२ दलघफूट (८७.८८ टक्के) होता. जिल्ह्यातील सर्वात मोठे मुळा धरण ७६ टक्के (१९ हजार ७२० दलघफूट) भरले. तालुक्यात अन्य ठिकाणी आजपर्यंत पडलेला पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे-पांजरे १८६९, भंडारदरा १५४०, निळवंडे ६९७, अकोले ४६८, कोतुळ २८९, आढळा धरण १७१