सांगली : सांगली-मिरजेसह पूर्व भागात पावसाचा जोर अल्पसा ओसरला असला तरी पश्चिम भागात पावसाचा दमदार वर्षाव सुरूच आहे. कृष्णा, वारणेच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने नदीतील पाणी पातळी वाढली असून, कृष्णा नदीवरील पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तर येरळा नदीसह ओढ्यांना पूर आल्याने कडेगाव तालुक्यातील पाच जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडत असून, सूर्यदर्शनही झालेले नाही. रविवारी दुपारपासून रिमझिम पाऊस सुरू होता. रात्री मात्र पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सोमवारी दुपारपर्यंत पावसाची हजेरी होती. सांगली व मिरज परिसरात दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला असला तरी अधूनमधून एखादी सर येतच आहे.
पश्चिम भागात पडत असलेल्या मुसळधार पावसाने कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, कृष्णा नदीवरील पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये बहे, डिग्रज, सांगली, म्हैसाळ आणि राजापूर (जि. कोल्हापूर) या बंधाऱ्यांचा समावेश आहे. या बंधाऱ्यांवरून पाणी वाहत असून बंधाऱ्यांवरून होत असलेली वाहतूक थांबविण्यात आली आहे. हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमावर पाणी विस्तारले असून, सोमवारी सायंकाळी सांगलीतील आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी १६ फुटांवर पोहचली असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
पुराचे पाणी आल्याने तासगाव तालुक्यातील तीन व कडेगाव तालुक्यातील दोन जिल्हा मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामध्ये तासगाव तालुक्यातील कुमठे-सांबरवाडी, राजापूर-शिरगाव, पेड-नरसेवाडी आणि कडेगाव तालुक्यातील रामापूर पुलावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तर हिंगणगाव ते अमरापूर रस्त्यावरील चिखली पुलावरून पाणी वाहत आहे.
सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ३०.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे ५५ मिलीमीटर नोंदला गेला. तालुकानिहाय झालेला पाऊस असा – मिरज २४.४, जत २५.४, खानापूर ४४.८, वाळवा १७.९, तासगाव ३६.४, शिराळा ३८.५, आटपाडी १९.७, कवठेमहांकाळ ३८.६, पलूस ३५.७ आणि कडेगाव ४९.७ मिलीमीटर.जिल्ह्यात गेले १४ दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडत असून, सोमवारअखेर जिल्ह्यात सरासरी २०७.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मे महिन्याच्या सरासरी पावसाच्या तुलनेत सव्वाचार पट पाऊस या कालावधीत झाला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने महापालिकेचा आपत्ती विभाग सक्रिय झाला आहे. सोमवारी आयुक्त सत्यम गांधी यांनी संभाव्य पूरग्रस्त भागाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यांनी सांगलीतील मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, कर्नाळ रोड, बायपास रोड आणि मिरज कृष्णा घाट येथे पाहणी केली. स्थलांतरित होणाऱ्या लोकांसाठी उभारण्यात येणाऱ्या निवारा केंद्राचीही त्यांनी पाहणी करून आपत्ती व्यवस्थापनाला सूचना दिल्या.