भाजपावर अनेकदा छोट्या प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा आरोप झालाय. शिवसेनेकडूनही युती तोडताना असाच आरोप झाला. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “कुणी संपवायचं ठरवून कुणी संपत नाही आणि हे सर्वांनी पश्चिम बंगाल व तामिळनाडूत पाहिलं आहे,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. तसेच प्रत्येक राजकीय पक्षाला मी मोठा व्हावं असं वाटतं ते चुकीचं नाही, असंही नमूद केलं. ते शनिवारी (२३ जुलै) झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे म्हणाले, “पश्चिम बंगाल, तामिळनाडूत सर्वांनी पाहिलं की असं कुणी संपवायचं ठरवून कुणी संपत नाही. तुम्ही हाराकिरी केली तर त्याला परमेश्वरही वाचवू शकत नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला मी मोठा व्हावा असं वाटतं. यात काहीच चुकीचं नाही. समोरचा संपावा आणि मला राज्य मिळावं असं प्रत्येकाला वाटतं. मात्र, समोरच्याने आपआपला विचार करायचा असतो. मी कसा वाढेन हा विचार केला पाहिजे.”

“तुम्हीच आत्मघात करायचं ठरवलं तर समोरच्या पक्षाने काय करायचं?”

“एखाद्याची रेष खोडण्यापेक्षा मी माझी रेषा ओढेल असं आपल्याकडे म्हणतात. मात्र, हा विचारच दिसत नाही. तुम्हीच आत्मघात करायचं ठरवलं तर समोरच्या पक्षाने काय करायचं? काहीच करू शकत नाही,” असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.

“कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही”

राज ठाकरे म्हणाले, “मला आत्ताची राजकीय स्थिती पाहून मला चुकीचा कॅरम फुटल्यावर जसं कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहे हे कळत नाही तसं वाटतंय. कोण कुठे आहे हेच कळत नाहीये. आत्ता लोकांना आपण मतदान कुणाला केलं होतं हेही कळत नसेल.”

“मतदान झालं, मतदानानंतर निकाल आले. निकाल लागल्यानंतर एक दिवस पहाटे शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी राज्यपालांकडून शपथ घेतली. मग ते फिस्कटलं आणि शरद पवार व उद्धव ठाकरेंची बैठक झाली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी युती झाली. त्याचं एक सरकार स्थापन झालं. आता त्यातून काही आमदार फुटले आणि ते भाजपाकडे गेले. आता भाजपाचा सत्तेत आलाय आणि मुख्यमंत्री जे फुटले त्यांचा झालाय,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.

“राजकीय दृष्ट्या असा महाराष्ट्र कधीच बघितला नाही”

“महाराष्ट्रात काय चाललं आहे? आपण राजकीय दृष्ट्या असा महाराष्ट्र कधीच बघितला नाही. याचं कारण यांना लोकांच्या मतांची किंमत नाही,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.

“भावनेच्या आहारी जाऊन लोक त्याच त्याच लोकांना मतदान करत बसतात”

राज ठाकरे पुढे म्हणाले, “लोक बाळासाहेब होते म्हणून भावनेच्या आहारी जाऊन त्याच त्याच लोकांना मतदान करत बसतात. मात्र, बाळासाहेब कुठे आहेत? या भावनांना काय अर्थ आहे का? दिवसेंदिवस आपण महाराष्ट्र मागे नेत आहोत याचा साधा विचारही मनात येत नाही.”

हेही वाचा : शिवसेना फुटीला भाजपा जबाबदार की शरद पवार? राज ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले…

“लोकांनी फुकटचं उन्हात उभं राहून यांना मतदान करत राहायचं का?”

“जे आमदार आपण निवडून देतोय तो आमदार भलतीकडेच जातोय. तोच आमदार पैसे घेऊन आणखी तिसऱ्याकडे जातोय. काय चाललंय. लोकांनी फुकटचं उन्हात उभं राहून यांना मतदान करत राहायचं का?” असा प्रश्न त्यांनी विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray answer on bjp and its effect on regional parties in india shivsena pbs
First published on: 23-07-2022 at 22:18 IST