दुकाने आणि आस्थापनांवर मराठी भाषेत नामफलक लावण्यासाठी दिलेली मुदत संपल्यामुळे नियमाचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर २८ नोव्हेंबरपासून कारवाई सुरू केली जाईल, असं मुंबई महापालिकेने सांगितलं होतं. मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी पाट्यांचा मुद्दा उचलून धरला आहे. राज्य सरकारने तथा वेगवेगळी शहरं आणि जिल्ह्यांमधील स्थानिक प्रशासनाने राज्यभरात दुकानांवरील आणि आस्थापनांवरील पाट्या मराठीत करून घ्याव्यात, अशी मागणी करत मनसेने अनेकवेळा आंदोलनही केलं आहे. तसेच न्यायालयीन लढाई लढली आहे. एका बाजूला मनसेचं आंदोलन चालू आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यायालयानेही दुकाने आणि आस्थानपनांवर मराठी भाषेत नामफलक असायला हवेत असं म्हटलं आहे. परंतु, राज्य सरकार किंवा मुंबई महानगर पालिकेने उचित कारवाई केलेली दिसत नाही

एकट्या मुंबईत तब्बल पाच लाख आस्थापना असून त्यात दुकाने, कार्यालये, हॉटेल, दवाखाने या सगळ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत मुंबईतील ८० टक्के आस्थापनांनी मराठी नामफलक लावले असून २० टक्के आस्थापनांनी देवनागरीत फलक लावलेले नाहीत. अमराठी भागात मराठी फलक न लावण्याचे प्रमाण मोठे आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे म्हणाले, आपलं सरकार नुसतं तोंड वाजवायला आहे. मराठी आणि हिंदुत्वाबद्दल केवळ बोलायला आहे. नुसतं बाळासाहेबांचं नाव घ्यायचं, बाळासाहेबांचे विचार – बाळासाहेबांचे विचार असं म्हणायचं, पण यांनी बाळासाहेबांचे कोणते विचार घेतले. न्यायालयाने सांगूनही सरकारला दुकानांवर मराठी पाट्या करून घेता येत नाही. यापूर्वी आम्ही मराठी पाट्या केल्या होत्या. तेव्हा सरसकट कराव्या लागल्या होत्या. पण या सरकारचा धाकच नाही.