मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईत विजयी मेळावा घेतला. या मेळाव्यात या दोघांचीही भाषणं झाली. त्यावेळी या दोघांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना दसरा मेळाव्यात बोलवू शकतात अशी शक्यता आहे. शिवसेनेच्या एका नेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चा सुरु झाल्या आहेत.
राज ठाकरेंना उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात बोलवणार?
२ ऑक्टोबर या दिवशी यंदा दसरा आहे. या दिवशी एक ऐतिहासिक घडामोड घडण्याची शक्यता आहे. ही घडामोड म्हणजे उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना शिवसेनेच्या मंचावर बोलवू शकतात. दसऱ्याला तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकतं असं वक्तव्य सचिन अहिर यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं आहे.

सचिन अहीर नेमकं काय म्हणाले?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे, ही केवळ दोन पक्षांची गरज नसून ते राज्यासाठी गरजेचे आहे. ही लोकांच्या मनातील भावना आहे. आता गणपती संपल्यानंतर पितृपक्ष सुरु होत आहे. त्यामुळे आता दसऱ्याला चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा आहे. दसरा मेळाव्यात आमचे नेते सध्याची परिस्थिती काय आहे आणि त्याला सामोरे कसे जायचे, याविषयी मार्गदर्शन करतील. दसरा मेळाव्यातून कार्यकर्त्यांना दिशा द्यायची असते. त्यामुळे हा मेळावा राजकीय आणि सामाजिक दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे, असे सचिन अहिर यांनी म्हटले. राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ हे एकमेकांना कायम बघत असतात. दसरा मेळाव्याला हे दोघे स्टेजवर एकत्र येतील, का माहिती नाही. पण आम्ही त्यांना आमंत्रित करु शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. आमच्याप्रमाणे त्यांचाही मेळावा असतो. त्यामुळे तेदेखील आम्हाला आमंत्रित करु शकतात असंही अहिर यांनी म्हटलं आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यातल्या भेटीगाठी कशा होत्या?
२७ जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते. राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन झालं आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील ही भेट महत्त्वाची मानली गेली. राज ठाकरे हे गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले तर उद्धव ठाकरे गणपतीच्या निमित्ताने शिवतीर्थावर गेले होते. आता दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू एकाच मंचावर आलेले पाहण्यास मिळणार का? याची चर्चा सचिन अहिर यांच्या वक्तव्यामुळे सुरु झाली आहे.