राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या विधानांवर मोठा वाद निर्माण झाला होता. यासंदर्भात बरेच आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांवर त्यांच्या शैलीत खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या विधानावरून राज ठाकरेंनी राज्यपालांना सुनावलं आहे.

पुण्यामध्ये मनसेच्या १६व्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन सोहळा मुंबईच्या बाहेर होत असल्यामुळे या सोहळ्याविषयी उत्सुकता होती. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली.

“मी पहिल्यांदा राज्यपालांना भेटायला गेलो, तेव्हा…”

राज्यपालांच्या विधानांचा समाचार घेतानाच राज ठाकरेंनी त्यांची नक्कल करत टीका केली. “मी त्यांना पहिल्यांदा भेटायला गेलो, तेव्हा मला वाटलं शेकहँड केल्यावर माझा हात बघायला लागतील. आप का मंगल इथर है, बुध उधर है..कुडबुड्या ज्योतिषासारखे. बघितलं ना कसे आहेत ते?”, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरेंनी राज्यपालांची नक्कल करून दाखवताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

“तुम्हाला काही माहिती आहे का?”

दरम्यान, राज्यपालांच्या विधानांवरून राज ठाकरेंनी टोला लगावला आहे. “आमचे राज्यपाल… काही समज वगैरे काही आहे का? शिवाजी महाराज, रामदास स्वामी तुम्हाला काही माहिती आहेत का? आपला काही संबंध नसताना नुसतं बोलून जायचं? ना छत्रपतींनी कधी सांगितलं रामदास स्वामी माझे गुरू होते, ना रामदास स्वामींनी कधी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज माझे शिष्य होते. नुसती भांडणं लावायची ज्यातून एकाचं शौर्य कमी करायचं आणि एकाची विद्वत्ता कमी करायची”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Raj Thackeray : “असं वाटतं मोदींना सांगावं दर महिन्याला दोन दिवस…”, पुण्यात राज ठाकरेंची फटकेबाजी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“फक्त माथी भडकावून मतं मिळवायची”

“आम्ही काही बोध घेणार की नाही? रामदास स्वामींनी काय लिहिलंय? रामदास स्वामींनी शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय ते माझ्या घरात लावलंय मी. त्यांनी शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय त्याहून चांगलं आजपर्यंत मी दुसरीकडे कुठे वाचलेलं नाही. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. आमच्याकडे योगी सापडतच नाही. धाड पडली की कळतं श्रीमंत आहे. आमच्याच महापुरुषांना फक्त बदनाम करायचं, तुमती माथी भडकवून मतं मिळवायची एवढाच उद्योग सुरू आहे यांचा”, असं देखील राज ठाकरे म्हणाले.