Raj Thackeray On Reservation : “महाराष्ट्रात इतक्या मुबलक गोष्टी आहेत की आपल्या महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाहीय”, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यांच्या या मागणीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करणाऱ्या काही संघटनांनी नाराजी व्यक्त केली. तर, ओबीसी समाजाच्या संघटनेने थेट राज ठाकरेंची भेटच घेतली. राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

आमच्या समाजात गरिबी आहे. आम्ही संघर्ष करून पुढे येतो. गेल्या अनेक महिन्यांपासून आरक्षणाची मागणी लावून धरलेली असताना तुम्ही असं वक्तव्य का केलं? असा प्रश्न त्यांना संघटनेने विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “मी जे बोललोय ते तुम्हाला आज समजणार नाही. अजून काळ जाऊद्यात. विधानसभेची निवडणूक होऊन जाऊदेत. ही निवडणूक झाल्यानंतर या गोष्टींचा अंदाज येईल.

हेही वाचा >> Raj Thackeray on Reservation : “महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही”, राज ठाकरेंचं विधान चर्चेत; म्हणाले, “माथी भडकवून…”

महाराष्ट्रासारख्या संधी कुठेच नाहीत

राजकीय लोकांच्या लढाईचा विषय वेगळा आहे. ज्यांना तो राजकीय दृष्ट्या वापरायचा आहे ते यातून साधून घेत आहेत. मी आज काय म्हटलं की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य इथल्या मराठी मुला-मुलींना महाराष्ट्रासारखी संधी कुठेच उपलब्ध नाही. महाराष्ट्रात आहे म्हणून बाहेरचे लोक येथे येत आहेत”, असंही राज ठाकरे म्हणाले.

“मागे मोर्चे निघाले होते. फडणवीस मुख्यमंत्री असताना. काय झालं त्याचं. १६ टक्के आरक्षण दिलं पण ते फसवं निघालं. हे जे तुमच्या तोंडाला पानं पुसत आहेत, यापासून सावध राहा”, असा इशाराही त्यांनी दिला.

तुम्हाला वाऱ्यावर सोडणार

ओबीसीची मागणी आहे. तर यासाठी आपल्या पक्षाच्यावतीने काय करता येईल? असा प्रश्नही राज ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “जरांगे पाटलांच्या उपोषणाला मी आलो होतो. मी तेव्हाच बोललो होतो की तुमच्या मनातील गोष्टी होणार नाहीत. यांना फक्त राजकारण करून तुम्हाला वाऱ्यावर सोडणार आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझ्या हातात राज्य आलं तर

“समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय काय होईल, मागण्या मान्य होणार नाहीत”, असंही संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं तर महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही. आपली मराठी मुलं-मुली, आपला शेतकरी यावर जो पैसा खर्च व्हायला पाहिजे तो नको त्या लोकांवर खर्च होतोय. हे जे पूल आणि ब्रीज बांधले जात आहेत, ते कोणासाठी बांधले जात आहेत? जे संपूर्ण महाराष्ट्रात पैसे खर्च व्हायला पाहिजेत, ते चार राज्यांमध्ये खर्च होत आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.