सरळ सांगून भोंगे निघणार नसतील तर मग होऊन जाऊ द्या, असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये घेतलेल्या जाहीर सभेमध्ये केलं. तीन तारखेच्या अल्टीमेटमनंतर दुप्पट आवाजात मशीदींसमोर हनुमान चालिसा वाजविण्याची भूमिकाही राज यांनी यासभेमध्ये जाहीर केली. मात्र आता ईदच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना एक आवाहन केलं असून ईदच्या दिवशी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या आरत्यांचं आयोजन करु नका असं सांगितलं आहे.

राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या एका आवाहनामध्ये ईदच्या दिवशी मुस्लिमांना त्यांचा सण आनंदाने साजरा करु द्या असं म्हटलंय. “उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या (औरंगाबादच्या) सभेमध्ये त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लीम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरवल्याप्रमाणे अक्षय्य तृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करु नका,” असं राज म्हणाले आहेत.

तसेच पुढे बोलताना, “आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमका काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन,” असंही राज यांनी म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केवळ महाराष्ट्रात नाही तर देशातील भोंगे हटविले पाहिजेत असे बजावताना, सरळ सांगून करत नसतील त्यांना आता एकदा महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे, हे दाखवूनच द्या असे आव्हान राज यांनी औरंगाबादच्या सभेत केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी अक्षय्य तृतीयेनिमित्त आरत्या आणि पूजा आयोजित केलेल्या. मात्र अशाप्रकारचे कोणतेही कार्यक्रम ईदच्या दिवशी करु नका असं राज यांनी आता कार्यकर्त्यांना सांगितलंय.