Raj Thackeray on Urban Naxal: महायुती सरकारने मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रायगडमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्याला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विकासाबद्दल भाष्य करताना सरकारवर टीका केली.
तसेच राज्याचे मंत्री एखादा प्रकल्प येत असताना त्यात आपले उखळ पांढरे कसे करतात? याबद्दलही राज ठाकरेंनी माहिती दिली.
राज ठाकरे म्हणाले, “रायगड जिल्ह्यात विमानतळ होत आहे. इथे आधीच एक मोठे बंदर आहे. या प्रकल्पासाठी काम करायला कोण माणसे येत आहेत? याचा सर्व राजकीय पक्षांनी विचार केला पाहिजे. या प्रकल्पामध्ये मराठी मुले अधिकाधिक कामाला लागतील, याचा प्रयत्न केला पाहिजे. बाहेरून आलेला उद्योगपती तुमच्याकडून जमिनी घेणार आणि वाटेल तसा थैमान घालणार, हे चालणार नाही.”
मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभा राहू देणार नाही
महायुती सरकारने आता नवीन कायदा आणला आहे. प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांना अर्बन नक्षल म्हणून संबोधून सरकार त्यांना अटक करू शकते. एकदा अटक करून दाखवाच. मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभा राहू देणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मानसन्मान राखूनच उद्योग आणावे लागतील”, असे आव्हान राज ठाकरे यांनी दिले.
राज ठाकरेंनी उघड केला मंत्र्यांचा उद्योग
“राज्यात कुठून कुठे रस्ते जाणार आहेत, हे मंत्र्यांना बरोबर माहीत असते. कारण तेच रस्ता ठरविणार आणि रस्ता होण्याआधी तेच जमिनी घेणार. मग उद्योगपतींशी हेच तडजोड करून गब्बर होणार. निवडणूक आली की, विषय, विचार बाजूला फेकून लोकांच्या तोंडावर पैसे फेकून मत घेणार. एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे. याच्या खोलात जाऊन विचार करण्यास कुणीही तयार नाही”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.