राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यातून महायुतीला आणि नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला आहे. यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राज ठाकरेंचे आभार मानले आहेत. तर महाविकास आघाडीने त्यांच्यावर टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नवनिर्माण सेना नाही तर नमोनिर्माण सेना आहे अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली. त्याबाबत विचारलं असता आज राज ठाकरेंनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते संजय राऊत?

“महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत खोक्याचे राजकारण सुरू आहे. त्याचे सूत्रधार मोदी-शाह आहेत. अशावेळेला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष, महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतील. याची उत्तरे त्यांनी दिली पाहीजेत, असं काय झालं की तुम्हाला अचानक महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा वाटला. तुमचा नमोनिर्माण पक्ष कसा झाला? नमोनिर्माण होण्याची गरज का पडली? त्यांच्या पक्षाने काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत.”

“शिवसेनेनेही भाजपाबरोबर युती केल्याचा दाखला राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना दिला होता. यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही कधीही स्वार्थासाठी भाजपाबरोबर राहिलो नाहीत. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि प्रमोद महाजन यांनी हिंदू मतांची विभागणी होऊ नये म्हणून युती केली होती. ती युती २५ वर्ष टिकली. पण भाजपाने खरे दात दाखवायला सुरुवात केल्यानंतर आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो” असं राऊत म्हणाले होते. याबाबत प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी त्यांना आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- सुनेत्रा पवारांसाठी प्रचारसभा घेणार का? राज ठाकरेंचं उत्तर, म्हणाले, “मैदानं..”

काय म्हणाले राज ठाकरे?

“कावीळ झालेल्या लोकांना जग पिवळं दिसतं ना तशी काही लोकांची परिस्थिती आहे. ते आत्ताच तुरुंगातून बाहेर आले आहेत त्यामुळे त्यांना जे हे वाटतं आहे.” असं म्हणत संजय राऊत यांच्या नमोनिर्माण आणि फाईलच्या आरोपाला राज ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याबाबत गुढीपाडवा मेळाव्यात घोषणा केली होती. तसेच त्या भूमिकेचे विश्लेषणही मी केले होते. भूमिका बदलली असा माझ्यावर आरोप होत आहे. पण २०१४ च्या अगोदरची भूमिका निवडून आल्यानंतर जर बदलू शकते, तर मलाही भूमिका बदलणे आवश्यक असते. मी भूमिका बदलली नव्हती तर धोरणांवर टीका केली होती. अर्थात टीका करताना मी त्यामोबदल्यात काही मागितले नव्हते. मला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून मी टीका करतोय किंवा माझे ४० आमदार फोडले म्हणून मी टीका केली नव्हती. मुद्द्यांवर टीका होती. त्या भूमिकांवर केलेली टीका होती. त्यानंतरच्या पाच वर्षात ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्याचं स्वागत केलं”, असं राज ठाकरेंनी आज स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray slams sanjay raut over his statement on ed file and support to narendra modi scj
First published on: 13-04-2024 at 15:13 IST