Raj Thackeray on Election Commission Local Body Polls : महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी व मंगळवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी मतदार याद्यांमधील घोळाचा मुद्दा निवडणूक आयोगासमोर उपस्थित केला. तसेच राज ठाकरे अधिकाऱ्यंना म्हणाले, “मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नका. त्यासाठी सहा महिने थांबावं लागलं तरी थांबू. परंतु, निवडणुका या पारदर्शक व निष्पक्षपणे पार पडल्या पाहिजेत.”

राज ठाकरे म्हणाले, “माझ्याकडे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधीची एक मतदार यादी आहे. या यादीमधील काही नावं मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे ती वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की मतदार यादीत नेमका कसला घोळ आहे. काही लोकांच्या पालकाचं वय त्यांच्यापेक्षा कमी आहे, तर काही ठिकाणी एकाच घरात शेकडो सदस्य आहेत.

राज ठाकरे यांनी वाचून दाखवलेले मतदार यादीतील घोळ

मतदाराचे नाव – धनश्री कदम
वडिलांचे नाव – दीपक कदम
मतदाराचे वय – २३ वर्षे

मतदाराचे नाव – दीपक रघुनाथ कदम
वडिलांचे नाव – रघुनाथ कदम
वय – ११७ वर्षे

मतदाराचे नाव – नंदिनी महेंद्र चव्हाण
वडिलांचे नाव – महेंद्र चव्हाण
वय – १२४ वर्षे

मतदाराचे नाव – महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण
वडिलांचे नाव – श्रीनाथ चव्हाण
वय – ४३

राज ठाकरे म्हणाले, “यापैकी कोण कोणाचे पालक आहेत तेच कळत नाही.”

याद्या दाखवल्या जात नसल्यामुळे घोळ होतो : राज ठाकरे

“२०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर एक यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये मतदारांची केवळ नावं होती. त्यामध्ये मतदारांचे फोटो नव्हते, पत्ता देखील नव्हता, इतर कुठलीही माहिती नव्हती. त्यात घोळ सापडल्यानंतर काहीच तासांत ती यादी संकेतस्थळावरून हटवण्यात आली. याबाबत आम्ही काल केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोललो. त्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की ही गोष्ट राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारित येते. मग याम्ही राज्य निवडणूक आयोगाशी बोललो. तर ते म्हणाले ही बाब केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारित येते. मग आम्ही दोन्ही आयोगाच्या प्रतिनिधींशी बोललो. ते दोन्हीही प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगाचेच अधिकारी आहेत. आम्ही त्यांना म्हटलं, जनतेला आणि राजकीय पक्षांना मतदारांच्या याद्या न दाखवण्यामागचं नेमकं कारण काय? तुम्ही या याद्या दाखवत नाही त्यामुळेच हा घोळ होतो.”

याद्या सुधारण्यासाठी सहा महिने लागत असतील तर निवडणुका त्यानंतर घ्या : राज ठाकरे

मनसे प्रमुख म्हणाले, “मतदार यादीमधील घोळ सुधारत नाही तोवर निवडणूक घेऊ नका अशी विनंती आम्ही निवडणूक आयोगाला केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आपण या निवडणुकांसाठी पाच वर्षे थांबलो आहोत. तर या याद्या सुधारण्यासाठी आणखी सहा महिने गेले तरी काहीच हरकत नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला सुचवलं आहे की या याद्या सुधारल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका.”