मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दसरा मेळाव्यात बोलवून उद्धव ठाकरे हे नवा इतिहास लिहितील का? हा प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आज शिवसेनेचा आलेला टिझर आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीय नेत्याने केलेलं सूचक विधान.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या यांच्या मागील दोन महिन्यांत चार भेटीगाठी
५ जुलै २०२५ : मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही मुंबईत एकाच मंचावर दिसले. यानंतर त्यांचं कौटुंबिक फोटो सेशनही झालं.
२७ जुलै २०२५ : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहचले, तिथे त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
२७ ऑगस्ट : गणेश चतुर्थीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सहकुटुंब पोहचले. यानंतर दोन्ही कुटुंबांचं स्नेहभोजनही झालं.
१० सप्टेंबर : उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल देसाई हे तिघंही अचानकच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहचले. त्यावेळी या दोन्ही भावांमध्ये एक तासभर चर्चा झाली.
राज ठाकरेंबाबत उत्सुकता कायम
या चार भेटी मागच्या दोन महिन्यांत घडल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महापालिका निवडणुकीत एकत्र येणार असेच संकेत दोन्ही बंधूंकडून दिले जात आहेत. अशात उत्सुकता आहे ती दसरा मेळाव्यात राज ठाकरे उद्धव ठाकरेंसह एकाच मंचावर दिसणार का? याबाबत उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हर्षल प्रधान यांनी माहिती दिली आहे.
काय म्हणाले हर्षल प्रधान?
“दसरा मेळाव्याची लोकांना प्रचंड उत्सुकता आहे. दसरा मेळाव्यात कुठल्या गोष्टी असतील याबाबत महाराष्ट्रातले शिवसैनिक माहिती घेत आहेत. शिवसैनिकांना माहिती व्हावी म्हणूनच आम्ही टिझर प्रकाशित केला आहे. धगधगते विचार असं आम्ही म्हटलं आहे कारण धगधगते विचार हे ठाकरेंचेच आहेत महाराष्ट्रात.” असं हर्षल प्रधान यांनी म्हटलं आहे. यानंतर राज ठाकरे दसरा मेळाव्यात असणार का? या प्रश्नाचं त्यांनी सूचक उत्तर दिलं. न्यूज १८ लोकमतशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी हे उत्तर दिलं.
दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार?
राज ठाकरेही दसरा मेळाव्यात असणार का? हे विचारलं असता हर्षल प्रधान म्हणाले, “ठाकरेंचे विचार ऐकायला जनता येते. ठाकरेंचे विचार जनता ऐकणार आहे, त्यासाठी शिवतीर्थावर येणार आहे.” असं हर्षल प्रधान म्हणाले. राज ठाकरे असतील का? विचारलं असता हर्षल प्रधान पुढे लगेच म्हणाले, “तो विषय माझा नाही, तो विषय उद्धव ठाकरेंचा आहे. त्यामुळे ठाकरेंचे विचार नक्कीच ऐकायला मिळतील. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकणं ही परंपरा आहे. त्यामुळे ठाकरेंचे विचार ऐकायला महाराष्ट्रातली जनता येईल.” असं सूचक विधान हर्षल प्रधान यांनी केलं आहे.