Rajan Patil Apologized to Ajit Pawar : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होत आहे. भाजपाकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्राजक्ता पाटील या निवडणुकीत निवडून येणार हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर पाटील कुटुंब, त्यांचे समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांनी नगर पंचायत कार्यालयाबाहेर जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांबरोबर नाचत असताना राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिलं.

बाळराजे पाटलांचा अजित पवारांना त्वेषाने आव्हान देतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसतंय की बाळराजे पाटील कॅमेऱ्याकडे बोट दाखवून अगदी त्वेषाने म्हणाले, “अजित पवार… सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय.”

राजन पाटलांच्या मुलावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची टीका

बाळराजेंच्या या व्हिडीओवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे (अजित पवार) विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, सुरज चव्हाण यांनी राजन पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत अजित पवारांची जाहीर माफी मागितली.

राजन पाटलांनी मागितली माफी

राजन पाटील म्हणाले, “आमच्या गावात कधी निवडणूक झाली नाही. यंदा निवडणूक लागली आणि तरुण पोरांचा उत्साह वाढला. मात्र, ही निवडणूकही बिनविरोध होणार म्हटल्यावर तरुणांनी त्याचा जल्लोष करण्याचा प्रयत्न केला. त्यात आमच्या मुलाने जे काही वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करणार नाही. कारण तो राजकारणात अजून खूप लहान आहे. त्याच्या तोंडून नकळत काही वक्तव्य गेलं असेल तर त्याचा वडील म्हणून मी पाटील कुटुंबाच्या वतीने माफी मागतो. थोरले पवार (शरद पवार) व राष्ट्रवादीपासून मी आता दूर आहे. मात्र, त्याला अजित पवार कारणीभूत आहेत असं मी म्हणणार नाही. मी राष्ट्रवादीपासून दूर असण्याला अनेक कारणं आहेत. मी त्या दोघांचंही नेतृत्व मान्य करतो.

माझ्या वैभवात दोन्ही पवारांचा सिंहाचा वाटा : राजन पाटील

“मी आजवर जे वैभव उभं केलं आहे त्यात शरद पवार व अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. आमच्या मुलाकडून नकळत, उत्साहाच्या भरात, भावनेच्या ओघात अपशब्द निघाला असेल. त्याबद्दल मी अजित पवारांची पूर्ण अंतःकरणापासून दिलगिरी व्यक्त करतो, त्यांची क्षमा मागतो. मी त्यांच्यापुढे नतमस्तक होतो आणि आता हा विषय थांबवावा अशी विनंती करतो.”

“अजित पवारांनी माझ्या मुलाला पार्थ समजून पदरात घ्यावं”

दरम्यान, बाळराजे पाटलांच्या वक्तव्यानंतर आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी, सूरज चव्हाण यांच्यासह अनेकांनी टीका केली. त्यावर राजन पाटील म्हणाले, “सर्वांनाच राग आला असेल आणि हे स्वाभाविक आहे. मी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून विनंती करतो की आपलाच मुलगा समजून त्याला माफ करा. मी अजित पवारांना विनंती करतो की तुमचा पार्थ जसा आहे त्याच जागी बाळराजेला ठेवून त्याला पदरात घ्या. तो चुकला असेल, त्याला माफ करा. अजित पवारांनी त्याला पार्थ समजून पदरात घ्यावं.”