रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील तिवरे पोस्ट कार्यालयातील शाखा डाकपालाने तब्बल १६ खातेदारांच्या खात्यातील दोन लाख तेवीस हजार पाचशे रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी अटक करुन अपहाराची रक्कम व्याजासह वसूल करण्यात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिवरे पोस्ट कार्यालयात शाखा डाकपाल म्हणून कार्यरत असलेला अमोल एकनाथ गोतावडे (वय २९) रा. गोतावडेवाडी याने ९ ऑगस्ट ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत पदाचा गैरवापर करून ग्राहकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्याने ११ खातेदारांच्या बचत खात्यांवर बनावट अंगठे व सह्या करून तब्बल १ लाख ५१ हजार रुपये काढले. तसेच दोन ग्राहकांकडून बचत खात्यासाठी मिळालेले ४० हजार रुपये स्वतःजवळ ठेवले. तर तिघा महिला खातेदारांच्या ठेव रकमेपैकी ३२ हजार ५०० रुपये जमा न करता अपहार केला. अशा प्रकारे गोतावडे याने एकूण २ लाख २३ हजार ५०० रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी पोस्ट कार्यालय निरिक्षक योगेश प्रकाश जाधव यांनी राजापुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता राजापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३१६ (५) व ३३६ (२) (क्र. १७३/२०२५) नुसार गुन्हा दाखल केला. यातील तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून व्याजासह २ लाख ४२ हजार रुपये हस्तगत केले आहेत.