सांगली : ज्या देशाला माती जपता येत नाही, त्या देशाला भवितव्य उरत नाही. यासाठी आपण मातीवर आणि निसर्गावर प्रेम करूनच आपला विकास साधला पाहिजे, असे मत शेतीचे अभ्यासक राजेंद्र भट यांनी व्यक्त केले. विटा येथील नेचर केअर फर्टिलायझर्सच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय नेचर केअर सन्मान पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अभिनेत्री सायली संजीव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सेंद्रिय शेतीचे अभ्यासक जयंत तथा बाबा बर्वे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आशिष वेले, नेचर केअरचे संचालक जयदेव बर्वे, बरवा स्कीन थेरपीच्या संचालिका कामाक्षी बर्वे, अरुण नाईक उपस्थित होते. यावर्षी वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, जंगल निर्मिती क्षेत्रातील राज्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा नेचर केअरने सन्मान केला.

श्री. भट म्हणाले, जल, जंगल आणि जमिनीचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. ती गरज ओळखून बाबा बर्वे गेली तीस वर्षांहून अधिक काळ माती जपण्याचे आणि संवर्धनाचे काम करीत आहेत. विषमुक्त अन्न हा नेचर केअरचा संकल्प आहे. सुशिक्षित आणि सुसंस्कृत जगायचे असेल, तर सर्वांनी हा संकल्प जबाबदारी म्हणून पार पाडला पाहिजे.अभिनेत्री सायली संजीव म्हणाल्या, माणसाला आपल्या जीवापेक्षा झाड जवळचं वाटलं पाहिजे. झाडाचे नुकसान झाले तर व्यक्तिगत नुकसान झाल्याची जाणीव झाली पाहिजे. तरच निसर्गावर आपण प्रेम करू.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर्षी पाच मुख्य पुरस्कार देण्यात आले. यामध्ये आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन, वृक्ष संवर्धन समिती, बार्शी, चंद्रशेखर व शिवांगी दातार, संगमेश्वर, रोहन रक्षिला फाऊंडेशन, गोंदवले, सर्व सामाजिक संघटना, कर्जत आणि संकल्प वनराई, छत्रपती संभाजीनगर यांना सन्मानित करण्यात आले. तर गावच्या लेकीचं झाड, करकंब, निसर्गप्रेमी मित्र मंडळ, पेठ वडगाव, प्रा. आर. के. पाटील, बिद्री यांना उत्तेजनार्थ आणि पुणे येथील डॉ. अंकुर पटवर्धन यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्वागत आणि प्रास्ताविक नेचर केअरचे संचालक जयदेव बर्वे यांनी केले.