नांदेड : नांदेडचे भूमिपुत्र व सध्या पुणे जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असणारे राजेंद्रसिंह प्रभूसिंह गौर यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. एकाच पोलीस अधिकाऱ्याला दुसऱ्यांदा हे पदक मिळणे ही खूप दुर्मीळ बाब आहे. यापूर्वी २०१८ मध्ये त्यांच्या उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी त्यांना पहिल्यांदा राष्ट्रपती पदक सन्मान मिळाला होता. त्यानंतर आता पुन्हा २०२५ मध्ये उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले.
नाशिक येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये त्यांचा सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून सन्मान झाला आहे. ज्या-ज्या ठिकाणी त्यांनी सेवा दिली त्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीचा आलेख कमी झाला. सामाजिक, धार्मिक सलोखा त्यांनी कायम ठेवण्यात यश मिळवले.
गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक गंभीर गुन्हे त्यांनी काही तासात उघडकीस आणले. त्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या प्रत्येक गुन्ह्याची उकल त्यांनी केली. लातूर शहरासह जिल्ह्यातील किल्लारी, वाढवणा, चाकूर, पूर्णा, आखाडा बाळापूर, हिंगोली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर येथे दहशतवाद विरोधी पथक प्रमुख म्हणून काम करताना उल्लेखनीय कार्य केले.