स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. पुण्याला जात असताना राजू शेट्टी यांनी साताऱ्यात येऊन उदयनराजेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी उदयनराजेंना तुम्ही भाजपात जाऊ नका अशी विनंती केली. “तुम्ही शेतकऱ्यांचे नेतृत्व करावे, लोकसभेत शेतकऱ्यांसह जनसामान्यांचा आवाज उठवावा. तसंच सध्या महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती ठीक नाही. त्यामुळे तुम्ही भाजपात जाऊ नका,” असं राजू शेट्टी यांनी उदयनराजेंना सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“महाराष्ट्रात जे सध्या सुरू आहे त्याची आणि उदयनराजे भोसले यांची तुलना होऊ शकत नाही. विरोधी पक्ष सक्षम राहण्यासाठी उदयराजेंनी भाजपमध्ये जाऊ नये. सध्यातरी त्यांनी याबाबतचा निर्णय घेतलेला नाही,” असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.

“सध्या शेतकऱ्यांचे प्रश्‍न केंद्रात ताकदीने मांडणारे विरोधी पक्षांचे खासदार असणे आवश्‍यक आहे. मात्र विरोधी पक्षाचे खासदार कमी झाले असून पोकळी निर्माण झाली आहे. सध्या भारतीय जनता पक्षाचे तीन कार्यकर्ते आहेत. एक सीबीआय, दुसरी ईडी आणि तिसरा इन्कम टॅक्‍स विभाग…यांचा गैरवापर करून सध्या भाजपने मेगाभरती सुरू केली आहे. विविध विभागात आर्थिक गैरव्यवहार झाले असून त्याच्या चौकशीत ईडीला रस नाही तर सीबीआयला इतर प्रश्‍न दिसत नाहीत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास गतीने करता आला नाही. राजकीयदृष्ट्या त्रासदायक असलेल्यांच्या मागे चौकशीचा फेरा लावून त्यांना भाजपमध्ये घेणे आणि पुन्हा त्यांची चौकशी थांबविणे अशी भाजपची मेगाभरती सुरू आहे,” असे सांगून उदयनराजेंशी झालेल्या चर्चेत अद्याप माझे काहीही ठरलेले नाही असे त्यांनी सांगितले आहे.

“सांगली कोल्हापुरातील पूरग्रस्त वाऱ्यावर आहेत आणि सरकारला निवडणुकीचे पडले आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहे. पुरपरिस्थितीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. घरांच्या नुकसानीत सानुग्रह अनुदान देताना पात्र लोकांची यादी मोठी आणि पैसे कमी आहेत. जाणीवपूर्वक अपात्र लोकांची नावे या यादीत घुसवायची व गावागावात तंटे निर्माण करायचे आणि वाटप थांबवायचे असा प्रकार सुरू आहे. केवळ बाहेरून आलेल्या मदतीवर पूरग्रस्त अवलंबून आहेत. शासनाकडून अद्याप पुरेशी मदत मिळालेली नाही”, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetty meets ncp mp udyanraje bhosale sgy
First published on: 04-09-2019 at 16:54 IST