अंबरनाथ : राज्यसभा निवडणुकीत गाफील राहून पराभव झाला. त्यामुळे आता विधान परिषदेला ताकही फुंकून प्यावे लागेल असे परखड मत राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. रविवारी अंबरनाथमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी उपस्थित असताना त्यांनी हे वक्तव्य केले.

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या विविध सहयोगी पक्षांकडून पराभवानंतर मत व्यक्त केली जात आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी रणनितीवर बोलत असतानाच महाविकास आघाडीचे नियोजन कुठे चुकले याबाबतही उघड प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. येत्या विधान परिषद निवडणुकीत याची खबरदारी घेण्याबाबतही मत व्यक्त केली जात असतानाच विधान परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांनीही यावर परखड मत व्यक्त केले आहे. अंबरनाथ येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना हे मत व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही बरेच काही शिकलो. जो अतिआत्मविश्वास होता त्यामुळे काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. त्याकडे आता दुर्लक्ष होता कामा नये, ही शिकवण यावेळी मिळाल्याचे खडसे यांनी कबूल केले. मात्र पराभव हा पराभव असतो. तो शिवसेनेचा असला तरी तो महाविकास आघाडीचा पराभव आहे. हा पराभव जिव्हारी लागल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. येत्या विधान परिषद निवडणुकीत यापासून धडा घेत ताकही फुंकून पिण्याची गरज असून त्यानुसार निवडणुकीची तयारी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विधानपरिषदेची तयारी करत असताना प्रत्येक गोष्ट तपासून आणि विश्वासाने करण्याची आवश्यकता आहे, असेही खडसे म्हणाले. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीचा धसका विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारांनी घेतल्याचे बोलले जाते आहे.