रायगड किल्ला संवर्धनाच्या कामात खाबूगिरी आणि बाबूगिरीचा शिरकाव झाल्याचा आरोप खुद्द रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी केला आहे. रायगड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. “प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जाणारी कामे पुरातत्व विभागाकडून रोखली जात आहेत. तर महाड ते पाचाड मार्गाच्या कामात टक्केवारी घेतली जात असल्याचा,” खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला. यांसदर्भात संबधित विभागांशी पुराव्यासह पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुरातत्व विभागाने काम थांबविण्याचे आदेश देणे चुकीचे
“रायगड किल्ल्यावर प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांना कार्यारंभाचे आदेश दिल्यानंतर पुरातत्व विभागाने काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. किल्ल्याच्या संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाने करायचे, तर इतर काम प्राधिकरणाच्या विशेष विभागाने करायचे असे दिल्ली येथे प्रधानमंत्री कार्यालयातील बैठकीत ठरले होते. त्यानुसार काही कामे प्राधिकरणाने सुरु केली होती. मात्र पुरातत्व विभागाने ती थांबवली. हे चुकीचे आहे,” अशी नाराजी संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

परवानगी न घेता रायगड रोप-वे च्या संचालकांकडून विस्तारीकरणाचे काम
“दुसरीकडे रायगड प्राधिकरण तसेच संबधित यंत्रणांची कुठलीही परवानगी न घेता रायगड रोप-वे च्या संचालकांकडून विस्तारीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी बांधकामही करण्यात आले आहे. महत्वाची बाब म्हणजे रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून रोप वेचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतुद रायगड संवर्धन आराखड्यात करण्यात आली आहे. असे असतांना प्राधिकरणाला अंधारात ठेऊन खासगी रोप-वे ला परवानगी देण्याचा घाट पुरातत्व विभागाने परस्पर घातला आहे,” असाही आरोप यावेळी त्यांनी केला. हे काम तात्काळ थांबले पाहीजे. रोप वे कडून गडावर येणाऱ्या शिवभक्तांची लूट सुरु आहे. ती थांबली पाहिजे असं यावेळी संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

महाड-पाचाड रस्ता रुंदीकरणाच्या कामात टक्केवारी काढण्याचे प्रयत्न
“महाड ते पाचाड दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. निविदा प्रक्रीया पुर्ण होऊन दोन वर्ष झाली तरी ठेकेदाराने काम सुरु केले नाही. आता या ठिकाणी दोन उप कंत्राटदार नेमण्याचा घाट महामार्ग प्राधिकरणाने घातला आहे. यात कामात टक्केवारी काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे,” त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले. महामार्गाच्या कामात टक्केवारी होणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही अस म्हणत त्यांनी यावेळी महामार्ग प्राधिकरणावर निशाणा साधला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajya sabha member sambhaji raje chhatrapati raigad fort sgy
First published on: 27-12-2019 at 09:51 IST