राहाता : छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील साईभक्त परिवाराकडून ३५ किलो वजनाची ३० फूट लांब व ६ फूट रुंद राखी साईबाबांच्या चरणी समर्पित करण्यात आली. ही राखी कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी १५ दिवसांत बनवली. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या संकल्पनेवर आधारित ही राखी आहे. या अनोख्या राखीमध्ये फायबर प्लाय, मोती, जरी, बुटी आदी आकर्षक सजावटीच्या साहित्याचा नाजूक वापर करून ती तयार करण्यात आली आहे.

या राखीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तिन्ही सेना प्रमुख तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह तसेच सैनिकांची काळजी घेणारे श्रवण सिंग यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत.

साई मंदिराच्या बाहेर ज्या ठिकाणाहून साईच्या मूर्तीचे खिडकीद्वारे साईभक्त दर्शन घेतात, त्या ठिकाणी ही राखी लावण्यात आली असून, साई दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी ही राखी विशेष आकर्षण ठरत आहे. अनेक साई भक्त ही राखी पाहण्यासाठी गर्दी करत असून छायाचित्रे घेण्यासाठीही भक्तांची झुंबड उडाली आहे.

देशभरात रक्षाबंधन उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला गेला. शिर्डीतही मोठ्या भक्तिभावाने आणि आस्थेने हा सण साजरा केला. रक्षाबंधननिमित्तानं अनेक भगिनी साईंना भाऊ मानत त्यांच्या दर्शनासाठी या दिवशी गर्दी करतात. बंधुराज असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तीलाही राखी बांधण्यात आली. शनिवार, रविवार अशा सुट्ट्या जोडून आल्याने शिर्डीत साईभक्तांची मोठी गर्दी झाली आहे. रक्षाबंधन निमित्तानं साईभक्तांनी दिलेली राखी साईबाबांच्या मूर्तीच्या हाताला बांधली जाते. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे पूजन करून ‘श्रीं’ना राखी अर्पण केली.