शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने आयोजित केलेल्या श्रीरामनवमी उत्सवास सोमवारी मंगलमय वातावरणात, साईनामाच्या घोषात सुरुवात झाली. उत्सवासाठी देशाच्या कानाकोप-यातून पालख्या घेऊन आलेल्या भक्तांच्या साईनामाच्या गजराने अवघी शिर्डीनगरी दुमदुमली आहे. उद्या रामनवमी असल्याने उत्सवाचा मुख्य दिवस आहे.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी सोमवारी दिवशी पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांच्या प्रतिमेची व श्रीसाईसच्चरित्र ग्रंथाची मिरवणूक द्वारकामाईपर्यंत काढण्यात आली. संस्थानचे कार्यकारी अधिकारी अजय मोरे यांनी पोथी, उपकार्यकारी अधिकारी अप्पासाहेब िशदे व मंदिर प्रमुख रामराव शेळके यांनी श्रींची प्रतिमा, संस्थानचे पुरोहित उपेंद्र पाठक यांनी वीणा घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणूक द्वारकामाईत आल्यानंतर श्रीसाईसच्चरित्राच्या अखंड पारायणाचा शुभारंभ झाला. मोरे यांनी पहिल्या व िशदे यांनी दुसऱ्या अध्यायाचे वाचन केले. सकाळी मोरे यांच्या हस्ते श्रींची विधिवत पाद्यपूजा करण्यात आली. मंदिर परिसरात द्वारकामाई मंडळाने तयार केलेला श्रीरामाची प्रतिमा असलेला विद्युत रोषणाईचा देखावा पाहाण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती.
उत्सवाच्या निमित्ताने साईनगर मैदानावर आयोजित केलेल्या निमंत्रित कलाकारांच्या कार्यक्रमाला श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सोमवारी द्वारकामाई मंदिर पारायणासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात आले. संस्थान प्रशासनाने संभाव्य गर्दीचे नियोजन केल्यामुळे साईभक्तांना सुलभतेने दर्शनाचा लाभ मिळाला. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन दर्शन रांगेसह ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.