वाई: उद्धव ठाकरे शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे राज्याच्या आणि मुंबईच्या राजकारणावर काहीही फरक पडणार नाही. कोणी कोणाबरोबर युती करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. ते दोघे एकत्र आले म्हणजे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आले असे म्हणता येत नाही.
यापूर्वी २०१४ च्या निवडणुकीमध्ये भीमशक्ती आणि शिवशक्ती महायुतीत भाजपसोबत एकत्र आलेले आहेत, आणि त्यावेळी आम्ही भरपूर जागाही जिंकलेलो आहोत. त्यामुळे त्याचा परिणाम यापूर्वी समोर दिसून आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन युतीचा काहीही राज्याच्या कारणावर काही फरक पडणार नाही असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वाई येथे सांगितले.महाबळेश्वर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी व महत्त्वाच्या कार्यकर्त्यांचे एक दिवसीय अभ्यास शिबिर महाबळेश्वर येथे होत आहे .या शिबिरासाठी जात असताना वाई येथे साताराचे जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा >>> शिवसेना-वंचितचे भाजपपुढे आव्हान?, रामदास आठवले यांच्या नेतृत्वाची कसोटी
उद्धव ठाकरे यांची शक्ती कमी झाली आहे. त्यामुळे ते पर्याय शोधत आहेत आणि म्हणून त्यांनी वंचितशी युती केली आहे .परंतु महाराष्ट्रामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्ती पूर्वीपासून कार्यरत आहे .त्यामुळे नव्याने होणाऱ्या कोणत्याही युतीचा शिवशक्ती भीमशक्ती युतीवर कोणताही परिणाम होणार नाही. आंबेडकरी अनुयायांमध्ये भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे कोणतीही अस्वस्थता नाही. या अस्वस्थतेचा परिणाम आमच्या पक्षावर होणार नाही. आमचा पक्ष ज्या बाजूला असेल त्या बाजूला सत्ता असते हे अनेक वर्षाचे गणित आहे.
यावेळी मुंबई महापालिकेमध्ये भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची सत्ता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली देश खऱ्या अर्थाने विकासाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे आंबेडकरांचे अनुयायी त्यांच्यासोबत आहेत असेही ते म्हणाले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाण्याची भूमिका रिपब्लिकन पार्टीने व्यापक केली आहे. त्यासाठी यापुढे कोणती भूमिका असायला हवी, यासाठी महाबळेश्वर येथे कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांचे शिबिर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आठवले गट पदाधिकाऱ्यांचे महाबळेश्वर येथे एक दिवसीय अभ्यास शिबिर
१९९४ मध्ये पक्षाचे पहिले शिबिर झाले होते. यानंतर होणारे हे चौथे शिबिर आहे .सातारा जिल्हा हा परिवर्तनवादी आहे. छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांचे मोठे योगदान आहे सातारा जिल्ह्यात आहे. एक राजकीय व सामाजिक अशी मोठी पार्श्वभूमी साताऱ्याला आहे. डॉ आंबेडकरांनी ही सातारा जिल्ह्यात वास्तव्य केले आहे. अशा सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे एक दिवसाचे शिबिर होत आहे. या शिबिरासाठी राज्यभरातून पाचशे सदस्य उपस्थित राहतील. राज्याच्या व देशाच्या राजकारणामध्ये दररोज वेगवेगळे बदल होत आहे. त्याप्रमाणे लोकांच्या अपेक्षाही बदलत आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने ही आपला जनाधार व्यापक केला असून सर्व जाती धर्मांना पक्षा च्या चळवळीमध्ये सामावून घेतले आहे. यापुढील काळामध्ये पक्षासमोर कोणती आव्हाने आहेत. कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम केले पाहिजे. जनसंपर्क कसा वाढवला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात,तालुक्यात गावामध्ये बहुजन समाजातील सदस्याना कार्यकारणीमध्ये स्थान देण्याची गरज आहे. दलित समाजाबरोबरच शेतकरी कष्टकरी शेतमजूर व्यापारी मराठा समाज यांच्या प्रश्नाबाबत आंदोलनाची तयारी राहायला हवे. ही व्यापक भूमिका घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे स्वागताध्यक्ष सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड आहेत.
