भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज चंद्रपूरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. या सभेत रामदास आठवले यांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे, शरद पवारांवर निशाणा साधला. रामदास आठवले यांनी संपूर्ण भाषणात शेरोशायरी करत सभा गाजवली. “जे कधीच राहिले नाही कुणाचे मिंधे, म्हणून येथे आले एकनाथ शिंदे”, अशी शेरोशायरी रामदास आठवले यांनी केली.

रामदास आठवले काय म्हणाले?

“चंद्रपूरचे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोली-चिमूरचे भाजपाचे उमेदवार ज्यांना नेते म्हणण्याची गरज नाही कारण त्यांच्या नावातच नेते आहे असे अशोक नेते. या दोघांच्या प्रचारानिमित्त आज या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहेत. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आले आहेत. जे कधीच राहिले नाहीत कुणाचे मिंधे, म्हणून या ठिकाणी आलेले आहेत एकनाथ शिंदे”, असे रामदास आठवले म्हणाले.

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, “आपण सर्वजण जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्राचं गीत गाऊ, कारण या ठिकाणी आलेले आहेत सुधीरभाऊ.” यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल रामदास आठवले म्हणाले, “आपल्या सर्वांचे लाडके नेते या ठिकाणी आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत सक्रिय राजकारणी आहेत. अत्यंत शक्तिशाली असणारे ते राजकारणी आहेत. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मजबूत करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे.”

हेही वाचा : “…तेव्हा बाळासाहेब ठाकरे स्वत: काँग्रेसविरोधात उभे राहिले होते”, पंतप्रधान मोदींकडून काश्मीरचा उल्लेख करत हल्लाबोल!

“महाराष्ट्रात महायुती मजबूत करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फारच मोठा आहे वाटा, कारण त्यांनी काढलेला आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काटा. आता हे (शिंदे गट आणि अजित पवार गट) आमच्याबरोबर आले आहेत. तसेही तिकडे राहून काही उपयोग नव्हता. मीदेखील पूर्वी तिकडे होतो. पण तिकडे राहून काही उपयोग नव्हता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे”, असे रामदास आठवले म्हणाले.

“ज्यावेळेला मी चंद्रपूरमध्ये येतो, त्यावेळेला माझ्या आठवणीत येते चंद्रयान आणि आता साऱ्या जगाचे असते भारताकडे ध्यान. या देशाची १४० कोटी जनता आहे मोदींची फॅन, कारण या निवडणुकीत आम्ही लावणार आहोत इंडिया आघाडीवर बॅन, आम्ही करणार आहोत चारसौ पार मग का होणार नाही काँग्रेसची हार”, अशी कविता करत रामदास आठवले यांनी निशाणा साधला.

Story img Loader