Ramdas Athawale : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील महायुतीवर नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर या आधीही रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीत आरपीआयने दोन जागा मागितल्या होत्या. मात्र, त्यांना त्या मिळाल्या नाहीत. विधानसभेच्या निवडणुकीतही आरपीआयला एक देखील जागा मिळाली नाही. त्यानंतर विधानपरिषदेमध्येही एकही जागा त्यांच्या पक्षाला मिळाली नाही, त्यामुळे रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर आता पुन्हा एकदा रामदास आठवले यांनी महायुतीवर नाराजी बोलून दाखवत खंत व्यक्त केली आहे. महायुती सरकारमध्ये आरपीआयला एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आता महायुतीच्या काळात आमच्या पक्षाला सत्ता मिळत नाही. मात्र, शरद पवारांच्या काळात काँग्रेसच्या आघाडीबरोबर असताना आमच्या पक्षाला सत्ता मिळायची असं म्हणत महायुतीमध्ये आमच्यावर अन्याय होत असल्याचं रामदास आठवले यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
रामदास आठवले काय म्हणाले?
“आज आमची अडचण अशी आहे की आता मला एक मंत्रिपद मिळालेलं आहे. पण माझ्या पक्षाचा एकही खासदार किंवा आमदार नाही. तरीही माझ्या पक्षाची जी काही छोटी-मोठी ताकद आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती आहे. त्यामुळे मला तीन वेळा त्यांनी मंत्रिमंडळात घेतलं. मात्र, आमच्या पक्षातील बाकीच्या लोकांना काही मिळत नाही. दिल्लीतही काही पद मिळत नाही आणि महाराष्ट्रात नाही”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
“आम्हाला एखादे महामंडळ किंवा मंत्रिपद मिळायला हवं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अनेकदा चर्चा झाली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षासाठी अनेकदा विधानपरिषदेसाठी नावे जाहीर केली. पण आमच्या पक्षाला विधानपरिषदेची एक जागाही दिली नाही. विधानसभेला एकही जागा दिली नाही, तर विधानपरिषदेची तरी एक जागा द्यायला हवी होती, तसेच आमच्या पक्षाचा एक मंत्री देखील करायला हवा होता”, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
“आमच्यावर अन्याय होतोय ही खरी गोष्ट आहे. मला एकट्याला मंत्रिपद मिळालं असलं तरी माझ्या कार्यकर्त्यांना देखील सत्तेचा सहभाग मिळायला हवा. शरद पवारांच्या काळात काँग्रेसच्या आघाडी बरोबर असताना आमचे ६ ते ७ जण विधानपरिषदेवर होते, ३ ते ४ मंत्री देखील झाले होते. त्यामध्ये मी मंत्री झालो, शेगावकर मंत्री झाले होते, दयानंद म्हस्के मंत्री झाले होते, मुंबईत आमचा महापौर झाला होता. पुण्यात देखील आमचा उपमहापौर झाला होता. त्या काळात (आघाडीच्या) आम्हाला अनेक ठिकाणी सत्ता मिळाली. मात्र, आता महायुतीच्या काळात आरपीआयला सत्ता मिळत नाही अशी परिस्थिती आहे”, अशी खंत रामदास आठवले यांनी बोलून दाखवली आहे.