धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मातेच्या दरबारात सप्तरंगाची उधळण करीत मोठ्या भक्तीमय वातावरणात रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला. शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या तुळजाभवानी देवीला रंग लावून भाताचा नैवेद्य अर्पण करण्यात आला आणि त्यानंरत गाभार्‍यात रंगांची मुक्त उधळण करण्यात आली.

दरवर्षी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात मोठ्या भक्तीमय वातावरणात रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात पुजारी आणि महंतांच्या उपस्थितीत रंगांची मुक्त उधळण केली जाते. शनिवारी सकाळी तुळजाभवानी देवीला पांढर्‍याशुभ्र रंगाची साडी नेसविण्यात आली. त्यानंतर देवीची आरती करण्यात आली. देवीच्या मूर्तीवर विविध प्रकारचे नैसर्गिक कोरडे रंग टाकून तुळजाभवानी देवीचे महंत आणि पुजारी बांधवांनी रंगपंचमीचा उत्सव देवीभक्तांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला.

आणखी वाचा-धाराशिवसाठी भाजपालाच उमेदवारी द्या! शिष्टमंडळाची फडणवीस यांच्याकडे मागणी

यावेळी विधीवत पध्दतीने परंपरेनुसार तुळजाभवानी देवीला विविध रंगांनी बनविलेला गोड स्वादिष्ट नैवेद्य दाखविण्यात आला. ‘आई राजा उदो-उदो’, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात गाभार्‍यासह संपूर्ण मंदिर परिसरात कोरड्या रंगाची उधळण करत रंगपंचमी साजरी करण्यात आली. रंगपंचमीचा उत्सव पाहण्यासाठी मंदिरात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.