भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील एका कार्यक्रमात खासदारांना मिळणाऱ्या तुटपुंज्या निधीवर मिश्किल विधान केलं आहे. माझ्या लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये निधी मिळतो. आणि मला सहा विधानसभा मतदारसंघासाठी पाच कोटी रुपये निधी मिळतात. या निधीतून बिड्या वाटायचं ठरलं तरीही निधी पुरणार नाही, असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
आज (बुधवार) रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जालना शहरातील बडी सडक रस्त्याच्या कामाचं उद्घाटन पार पडलं. यावेळी केलेल्या भाषणातून दानवे यांनी खासदार निधीवरून मिश्किल विधान केलं.
हेही वाचा- आज शिंदे गट-मनसे युतीची घोषणा होणार? एकनाथ शिंदेंनी मनसे कार्यालयाला भेट देताच चर्चांना उधाण
यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले की, आमदारांना एका विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी पाच कोटी रुपये मिळतात. तर मला माझ्या लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघासाठी पाच कोटी रुपये निधी मिळतो. त्यामुळे मला मिळणाऱ्या पाच कोटी रुपयांतून सगळ्यांना बिड्या जरी द्यायचं ठरवलं तरी तो निधी पुरणार नाही, असे सांगत दानवे यांनी खासदारांना मिळणाऱ्या तुटपुंज्या निधीवर बोट ठेवले.
हेही वाचा- “आता बोलायची वेळ आलीय, कारण…”; बीडमध्ये पंकजा मुंडेंचं थेट विधान, नेमका रोख कुणाकडे?
दानवे पुढे म्हणाले, खासदार निधीतून पैसे कमी मिळत असले तरी मी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आहे. त्यामुळे आमदार आणि खासदार निधीच्या भरवशावर न राहता मी राज्य सरकारकडून निधी आणू शकतो. यातून शहरातील रस्त्यांची कामे केली जातील. शहरातील एका रस्त्याच्या कामासाठी ७ कोटी रुपये दिले, म्हणून सरकारजवळील पैसे संपले असं नाही. माझ्याजवळ अलाउद्दीनचा चिराग आहे. त्यामुळे विकास कामांसाठी मी कितीही पैसे आणू शकतो, असंही दानवे म्हणाले.