रास्त भाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीने विविध उत्पादने शिधावाटप दुकानामधून विक्री करण्याला गेल्या काही वर्षात परवानगी मिळाली आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून आता शिधावाटप दुकानांमधून फळे आणि भाजीपाला मिळणार आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने नुकताच याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही नवी बाजारपेठ खुली होणार आहे.

रास्त भाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी विविध शासन निर्णयांद्वारे रास्त भाव दुकानांतून विविध उत्पादने आणि वस्तू विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. ज्यातून रास्त भाव दुकानदार आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन त्यांच्या दैनंदिन कामकाजात स्थैर्य येईल. यापूर्वी राज्य शासनाने विविध विविध प्रकारच्या वस्तू, उत्पादने, कृषिमाल शिधावाटप दुकानांमार्फत विकण्यास परवानगी दिलेली आहे. या धर्तीवर आता नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनीस (फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन) सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत शिधावाटप आणि रास्त भाव दुकानांमधून सभासद शेतकऱ्यानी उत्पादित केलेला भाजीपाला तसेच फळे विक्रीसाठी प्रायोगिक तत्वावर परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच शिधावाटप केंद्रातून भाजीपाला आणि फळेही मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाश्वत कृषी विकास इंडिया शेतकरी उत्पादक कंपनी, पुणे या शेतकरी उत्पादक कंपनीस पुणे जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्त भाव दुकानांमधून व फार्म फिस्ट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि., नाशिक या शेतकरी उत्पादक कंपनीस मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रातील ई-परिमंडळ व फ-परिमंडळ मध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत शिधावाटप दुकानांमार्फत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला आणि फळे विक्रीसाठी प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांकरिता परवानगी देण्यात आली आहे.