रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात एप्रिल मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे १८३ आंबा बागायतदारांच्या एकूण ४०.०१ हेक्टर पिकाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाकडून ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतक्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना १५ लाख मंजूर करण्यात आले आहेत. फेब्रुवारी ते मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील ४७३.६९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. यामुळे १३,६०७ शेतकऱ्यांसाठी ९ कोटी ३८ लाख २४ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्चमध्ये पाऊस पडलेला नसल्याने त्या कालावधीत आंबा बागायतदारांचे नुकसान झालेले नाही. मात्र, एप्रिल व मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त आंबा बागायतदारांना राज्य शासनाकडून १५ लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची मंजूर झालेली रक्कम जमा करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.