रत्नागिरी : रत्नागिरीतील एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आणि पॅरोलवर बाहेर आल्यानंतर फरार झालेल्या कैद्याला सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने (ग्रामीण) सोलापुरातील मंगळवेढा येथील एका शेतात अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व ५ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. फाईक मुस्ताक करंबेळकर (४६, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे. कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये ओळख झालेल्या निंगोडा बिराजदार या संशयिताने त्याची शेतात राहण्याची सोय केली होती. निंगोडा बिराजदारच्या भावाकडेही तीन पिस्तूल आणि २१ जिवंत काडतुसे सापडली.

रत्नागिरीतील फैयाज हकीम खूनप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला. चार महिन्यांपूर्वी त्याचा कालावधी संपूनही पुन्हा जेलमध्ये हजर झाला नव्हता. खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप झालेला फाईक करंबेळकरची कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये असताना निंगोडा हणुमंत बिराजदार याच्याशी ओळख झाली होती. पॅरोल संपल्यानंतर फरार झालेल्या फाईकला बिराजदार याने मंगळवेढा येथील एका शेतात त्याच्या शेतात पत्राशेड करून राहण्याची सोय केली होती. त्याची खबर सोलापूर ग्रामीण पोलिसांना लागली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या नेतत्वातील पथकाने त्याला पकडण्यासाठी पहाटेच्या सुमारास सापळा लावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फाईक सतत पिस्तूल लोड करून वावरत असल्याने पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी कोणतीही घाईन करता त्याला बेसावध असताना पकडले. त्याच्याकडे पिस्तूल व पाच जिवंत काडतूस सापडले. त्याने हे पिस्तूल निंगोडा बिराजदार याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यावेळी भाऊ राजकुमार बिराजदार याच्या घरात तीन पिस्तूल व १८ जिवंत काडतुसे असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या कारवाईत एकूण ४ पिस्तूल व २१ जिवंत काडतुस सापडले. ही पिस्तूल विक्रीसाठी त्यांनी आणली असल्याचे स्पष्ट झाले आहे.