रत्नागिरी – रत्नागिरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तीन कोटी दहा लाख तीस हजार रुपये किमतीची लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची अंबरग्रीस (उलटी) जप्त केली आहे. या प्रकरणी तीघांना ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाई अंबरग्रीस जप्त करुन अटक करण्यात आलेल्या तिघांवर वन्य जीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी एम.आय.डी.सी. परिसरातील बाफना मोटर्सच्या शेजारी काही इसम अंबरग्रीस विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बाफना मोटर्सच्या शेजारी सापळा रचला. या ठिकाणी छापा टाकून तीन आरोपींना कोणत्याही परवानगीशिवाय, विनापरवाना विक्रीच्या उद्देशाने अंबरग्रीस बाळगताना पकडले. यामध्ये रोहित रमेश चव्हाण (रा. आंबेशेत), आसिफ अस्लम मोरस्कर (रा. पिंपरी बुद्रुक, चिपळूण), तेजस परशुराम कांबळे (रा. आडरे, चिपळूण) या आरोपीचा समावेश आहे.

याप्रकरणी तिघांवर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे वन्य जीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून तीन कोटी दहा लाख तीस हजार रुपये किमंतीची ३ किलो ४ ग्रॅम अंबरग्रीस जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात वापरलेले एक वाहन देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे करत आहे.