रत्नागिरी – संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला हादरवून सोडलेल्या भक्ती मयेकर या तरुणीच्या खून प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलीस तपासात आरोपी दुर्वास पाटील याने भक्तीसह आणखी तीन जणांचा खून केल्याचे उघड झाले आहे.
दुर्वास पाटील याने मिरजोळे येथील भक्ती मयेकर या तरुणीबरोबर अनैतिक संबंध ठेवून त्याला दुस-या मुली बरोबर लग्न करायचे होते. मात्र यात भक्ती ही अडथळा ठरत असल्याने तीचा खून केला. भक्ती हिचा मृतदेह दोघा मित्रांच्या मदतीने आंबा घाटात नेवून दरीत फेकून दिला. भक्ती गायब झाल्याच्या तक्रारी नंतर १४ दिवसांनी तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दरीत आढळून आला. या प्रकरणात प्रमुख सूत्रधार असलेल्या दुर्वास पाटील राहणार खंडाळा याला पोलिसांनी अटक करुन चौकशी केली असता, त्याने भक्तीसह चार खून केल्याचे उघड झाले आहे.
रत्नागिरी पोलिसांना भक्ती हिच्या खुनाचा तपास उलगडत असताना दुर्वास पाटील याने तब्बल चार खून केल्याचे समोर आले आहे. यामध्ये दुर्वास पाटील याने सीताराम वीर (वय ५०,) रा. वाटद-खंडाळा, राकेश जंगम (वय २८) रा. वाटद,खंडाळा, भक्ती मयेकर रा. मिरजोले आणि तिच्या पोटातील निष्पाप बाळाचा खून झाल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे. यातील तीन खुनाची अधिकृत माहिती समोर आल्यावर चौथा खून भक्तीच्या गर्भातील बाळाचा झाल्याची माहिती समोर येताच संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
खून झालेले सीताराम वीर हे दुर्वास पाटील याच्या सायली बारमध्ये कामाला होते. कामाच्या वादातून त्यांना दुर्वास याने जबर मारहाण केली. आणि या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र याचा कुणालाही थांगपत्ता त्याने लागू दिला नाही. तसेच दुसरा खून झालेला राकेश जंगम हा सीताराम वीर यांच्या खुनाची माहिती घेत होता. याबाबत राकेशने घरी आईला सांगितले होते. ६ जून २०२४ रोजी तो कपड्याची बॅग आणायला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला होता. त्यांनतर तो कधीच घरी आला नाही. राकेश याच्या आईने तो बेपत्ता असल्याची फिर्याद जयगड पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर भक्ती मयेकर हिचा खून करुन तीच्या पोटातील बाळाला देखील संपविले.
भक्तीच्या खुनानंतर संशयावरून पोलिसांनी दुर्वास पाटीलला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत विश्वास पवार व निलेश भिंगार्डे यांनाही अटक केली आहे. या खून प्रकरणात न्यायालयाने तिघांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस तपासात दुर्वास पाटील यांच्या घरातून पोलिसांनी तलवारी आणि हॉकी स्टिक ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.