कोकेन विक्रीसाठी आलेल्या टोळीला पोलिसांच्या पथकाने अटक करून त्यांच्याकडून सुमारे ५० लाख रुपये किंमतीचे कोकेन जप्त केले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे, तटरक्षक दलाचा वर्ग २ चा एक अधिकारी आणि एक कर्मचारी सहभागी आहे. याप्रकरणी दिनेश शुभसिंह (वय २३ वर्षे, रा. हरियाणा), सुनील कुमार नरेन्द्र कुमार रनवा (वय २६, रा. जिल्हा शिखर राजस्थान), रामचंद्र तुळशीचंद मलीक (वय ५१, रा. सोनवद हरियाणा) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. यापैकी रामचंद्र हा कोस्टगार्डमध्ये वर्ग २ (मास्टर) अधिकारीपदावर, तर सुनील खलाशी म्हणून काम पाहत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत सांगितले की, “मिरजोळे येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या ( एमआयडीसी) या परिसरात कोकेनची विक्री करण्यासाठी एक टोळी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या एका कर्मचार्‍याला मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलिसांचे पथक तयार करून एमआयडीसीतील अग्निशामक दलाच्या कार्यालयाच्यामागील पडक्या इमारतीमध्ये सापळा रचण्यात आला. शनिवारी संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास तिघेजण या इमारतीसमोर रस्त्यावर अंधारात कोणाची तरी वाट बघत उभे होते. पोलिसांनी त्या तिघांवर झडप टाकून झडती घेतली असता त्यांच्याकडे ९३६ ग्रॅम अंमली पदार्थ आढळले. मोबाईल फॉरेन्सिक सपोर्टींग युनिटकडून तपासणी केल्यानंतर ते कोकेन असल्याचे दिसून आले. हा माल सर्व पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच, अटक केलेल्या तिघाजणांविरूध्द अंमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत”.

कोकेन जप्त होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे डॉ. मुंढे यांनी सांगितले. रत्नागिरी शहरासह परिसरात अंमली पदार्थांची छुपी विक्री सुरु आहे. गेल्या दोन वर्षात पाच ते सहा कारवाया करुन उद्ध्वस्त केले. रत्नागिरी- कर्नाटक अशी अंमली पदार्थ पुरवण्याची साखळी असल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले होते. एमआयडीसीतील कारवाईच्या निमित्ताने हरियाणा, राजस्थानमधील टोळी रत्नागिरीत सक्रिय झाल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratnagiri coast guard officer drug seized sgy
First published on: 22-07-2019 at 13:11 IST