रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड भरणे नाका येथे जगबुडी नदीच्या पुलावरुन किया कार सुमारे १०० ते १५० फूट खोल कोसळून झालेल्या भीषण अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात असताना चालकाचा कार वरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. किया कार (एम एच ०२ – ३२६५) हिने मुंबई मिरा रोड इथून नालासोपारा परिसरात राहणारे पराडकर कुटुंबीय तर मीरा-भाईंदर येथे राहणारे मोरे कुटुंबीय निघाले होते. दोन्ही कुटुंब मुंबई मिरा रोड भाईंदर येथून रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गावी देवरूख येथे जाण्यास निघाले होते.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नाका येथे कार आल्यावर जगबुडी नदीवर असलेल्या मोठ्या पुलावरून ही कार नदीत कोसळली. या भीषण अपघातात मेधा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर (वय २२), मिताली विवेक मोरे (वय ४५), निहार विवेक मोरे (वय १९), श्रेयस राजेंद्र सावंत (वय २३) या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे दोन्ही कुटुंब मुंबईवरून देवरुख येथे मिताली मोरे यांच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी निघाले होते.

या घटनेची माहिती मिळताच खेड येथील नागरिकांनी व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या सगळ्यांना क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. कारमधील जखमींना तातडीने बाहेर काढून कळंबणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अपघातात गंभीर जखमी झालेले परमेश पराडकर यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हालवण्यात आले आहे. तर विवेक मोरे हे गंभीरित्या जखमी झाले आहेत. त्यांनाही खेड येथून पुढील उपचार करता हलवण्यात आले आहे. या अपघाताचा पंचनामा करुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.