रत्नागिरी – संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील केतकर ज्वेलर्सच्या मालकाचे बुधवारी रात्री लुट करुन अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत गुन्हा दाखल करुन पोलीस तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. गुन्हेगारांना लवकर अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केतकर ज्वेलर्सचे मालक धनंजय गोपाळ केतकर (वय ६३) यांना बुधवारी रात्री दहा ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास साखरपा देवरुख मार्गांवरील वांझोळे पासून एक किलोमीटर अंतरावर अज्ञातांनी लुट करुन अपहरण केले.
धनंजय केतकर हे रात्री साखरपा येथून घरगुती कार्यक्रम आटपून देवरुख येथे जात असताना वांझोळे येथून एक किलोमीटर अंतरावर अज्ञात व्यक्तींनी गाडीची पाठलाग करून गाडीला गाडी घासली व वाटेतच गाडीची नुकसान भरपाई मागू लागले. मात्र या गडबडीत केतकर हे गाडीतून उतरताच त्यांच्या अंगावर बुरखा टाकून त्यांना जबरदस्तीने हल्लेखोरांनी आपल्या गाडीत कोंबले आणि वाटुळ जवळ आणले व मोठ्या रकमेची मागणी केली त्यांच्या जवळील सुमारे पंधरा लाखाचे दागिने रोख वीस हजार काढून घेतले व केतकर यांना तोंडाला व अन्य ठिकाणी मारहाण करून सोडून दिले.
या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. केतकर यांच्या अपहरणामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपहरणा विरोधात अज्ञातांवर रजि.नं.१०४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम गुन्हा ३११,३०९ (४), ३१० (१),१४० (२),१२७(२), ११५(२), ३१५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे.