रत्नागिरी – कोकणातून जाणा-या नागपुर शक्तीपीठ महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात पडणा-या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील साखरपा मुर्शी चेक पोस्ट जवळच शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रस्त्याचे काम सुरु असताना दरड कोसळली. रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या या महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतुकिला मोठा फटका बसला. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. काही वेळाने दरड हटवून एक मार्गी वाहतूक सुरु करण्यात यश आले.

रत्नागिरी जिल्ह्यात सलग तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका शक्तीपीठ महामार्गाला बसला आहे. रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणा-या या मार्गावर डोंगर कापण्याचे काम सुरु असताना साखरपा जवळील आंबा घाट मार्गावर दरड कोसळण्याची घटना घडली. साखरपा मुर्शी चेक पोस्टच्या पुढील धोकादायक वळणावर ही दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

या मार्गावर दरड कोसळल्या नंतर काही वेळानंतर एक बाजू मोकळी करुन ठप्प झालेली वाहतूक एक मार्गी सुरु करण्यात संबंधित यंत्रणेला यश आले. या ठिकाणाहून वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने आणि कमी वेगाने वाहने चालवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.