रत्नागिरी – रत्नागिरीतील औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) भागात राजरोस सुरू असलेल्या एका देह विक्रीचा अनैतिक व्यापार अड्ड्यावर रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी एका नेपाळी महिलेला अटक करत देहविक्रीच्या व्यवसायात अडकलेल्या दोन महिलांची सुटका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरजोळे येथील एमआयडीसी भागातील एका प्लॉटमध्ये अनैतिक व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचुन एका बनावट ग्राहकाला त्या ठिकाणी पाठवून खात्री झाल्यावर पोलिसांनी प्लॉट क्रमांक ई ६९, मिरजोळे येथे छापा टाकला. या छाप्यात एक नेपाळी महिला पुणे येथील दोन महिलांसह देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ तिच्यावर अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक केली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये पोलिसांनी देहविक्रीच्या व्यवसायातून दोन महिलांची सुटका केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती शबनम मुजावर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले आणि इतर पोलीस अंमलदार सहभागी होते.