दापोली – खेड तालुक्यातील खोपी फाटा परिसरात एका कारवर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई – गोवा महामार्गावर रेल्वे स्थानका नजीक खोपी फाटा परिसरात भर दिवसा हा प्रकार घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून पाठलाग करत एका कारला थांबवलं. सुरुवातीला कारवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत कारच्या काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर एका तरुणाने थेट रिवॉल्वर बाहेर काढून हवेत गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनमुळे परिसरात एकच धावाधाव झाली. खेड पोलीस देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर घटनास्थळी एक कार काचा फोडलेल्या स्थितीत आढळून आली. मोटारीतील दोन व्यक्ती गोळीबार झाल्याचं सांगत होते. हा गोळीबार नेमका कोणी केला, या संदर्भात पोलिसांसह घटनास्थळी उपस्थितांना माहिती देत होते. या घटनेनंतर खेड पोलीस फायरिंग केलेल्या रिवॉल्वरची पुंगळी (गोळीचा झाडलेला भाग) घटनास्थळी शोधण्याचं काम करत होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू होती. दरम्यान पोलिसही घडल्या प्रकाराची आता सत्यता तपासून बघत आहेत. भर दिवसा असा प्रकार घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खेड पोलीस निरीक्षक नितीन भोईर यांनी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरातील आणि उपस्थित नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार टू-व्हीलरला कट मारण्याच्या रागातून कारवर दगड मारल्याचा प्रकार घडला आहे असं खेड पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र गोळीबार झाल्याचा कोणताही पुरावा परिसरात मिळालेला नाही. आम्ही त्या दृष्टीने सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत, मात्र गोळीबाराची घटना घडल्याचा अद्याप कोणताही पुरावा अथवा सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं नाही. त्यामुळे गोळीबार झाल्याचा हा प्रथमदर्शनी बनाव वाटतो आहे. मात्र या संदर्भात आम्ही अजूनही माहिती घेत आहोत, अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी दिली आहे.